Pune News : फेसबुकवरील मैत्रीण पडली महागात, हॉटेलमध्ये बोलवले अन् काय झाले पाहा
Pune Crime News : सोशल मीडियावर मैत्री झाली. हळहळू त्यांचे चॅटींग सुरु झाले. मग तिने त्याला हॉटेलमध्ये बोलवले. त्यानंतर जे झाले त्यामुळे त्याला प्रचंड धक्का बसला. आता सोशल मीडियवरील मैत्रीण नकोच, अशी भावना त्याची झाली.
पुणे | 19 ऑगस्ट 2023 : सध्या सोशल मीडियाची क्रेझ युवक, युवतींमध्ये आहे. परंतु चाळीशी पार केलेले अनेक जण सोशल मीडियावर मैत्रीणी शोधत असतात. पुणे शहरातील ४६ वर्षीय व्यावसायिकाने अशीच मैत्रीण शोधली. मग दोघांमध्ये चॅटींग सुरु झाले. त्यामध्ये तो व्यावसायिक तिच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. दोघांमधील संवाद प्रेमाचे होत होते. मग तिने त्याला पुण्यातील वारजे भागातील हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवले. हॉटेलमध्ये गेल्यावर जे घडले, त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला.
काय आहे प्रकार
पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवासी असणाऱ्या ४६ वर्षीय व्यावसायिकाबाबत हा प्रकार घडला आहे. त्याने फेसबुकवरुन मनिषा नावाच्या मुलीशी मैत्री केली. ‘मनिषा जी’ नावाने तिचे फेसबुक अकांउट होते. दोघांमध्ये संभाषण होत होते. परंतु ते बनावट खाते होते. तिने त्या व्यक्तीला पूर्णपणे हनी ट्रॅपमध्ये फसवले. कारण दोघांमध्ये प्रेमाचे संवाद होत होते. त्या बनावट खात्यातील मनिषाने त्याच्याशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. वारजे भागात असलेल्या एका हॉटेलवर ही भेट १६ ऑगस्ट रोजी ठरली. ठरलेल्या वेळेस व्यावसायिक तिला भेटायला गेला पण भलताच प्रकार घडला.
त्या दिवशी काय घडले
व्यावासायिक हॉटेलमध्ये गेल्यावर दोन जण त्याच्याजवळ आले. आपण सायबर पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही एका मुलीला फसवत आहात, अशी तक्रार आली आहे. तुम्ही महिलांचे व्हिडिओ आणि फोटो काढले आहेत की नाही? हे तपासायचे आहे. यामुळे आमच्यासोबत चला, असे सांगितले. यानंतर दोन्ही आरोपींनी त्या व्यक्तीला एटीएममध्ये नेले. एटीएममधून ५३ हजार ५०० रुपये काढण्यास भाग पाडले. त्यानंतर पैसे घेऊन ते घटनास्थळावरून पसार झाले.
पोलिसात गुन्हा दाखल
आपण सायबर ठगांच्या जाळ्यात फसल्याचे त्या व्यावसायिकाला लक्षात आले. त्यानंतर त्याने पोलिसात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 392, 420, 506, 170, 384, 34 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.