NIAची पुणे शहरात मोठी कारवाई, ‘इसिस’मध्ये तरुणांची भरती करणाऱ्या डॉक्टरास अटक
Pune News : काही दिवसांपूर्वी पुणे शहरातून दोन दहशतवाद्यांना अटक केली होता. आता एनआयएने मोठी कारवाई केली आहे. ‘इसिस’मध्ये तरुणांची भरती करणाऱ्या डॉक्टरास अटक केली आहे.
पुणे | 28 जुलै 2023 : पुणे शहर दहशतवाद्यांचे केंद्र बनत आहे की काय? असा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती गेल्या पंधरा दिवसांत दिसत आहे. पुणे शहरात गेल्या १८ जुलै रोजी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी या दोन दहशतवाद्यांना अटक केली. या दोघांचा संबंध जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणाशी होता. या प्रकरणातील तिसरा आरोपी शहानवाज फरार झाला होता. आता राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) एका डॉक्टरास अटक केली आहे. हा डॉक्टर इसिससाठी तरुणांची भरती करण्याचे काम करत होता.
कुठे केली अटक
पुणे शहरातील कोंढवा भागांत मोठी कारवाई एनआयएने केली आहे. यापूर्वी अटक केलेले दोन्ही दहशतवादी कोंढवा परिसरात राहत होते. आता पुन्हा कोंढवा भागात इसिस या दहशतवादी संघटनेत तरुणाची भरती करणाऱ्या डॉक्टरास अटक केली आहे. डॉ. अदनानली सरकार (४३) असे त्या डॉक्टराचे नाव आहे. त्याच्याकडून गॅजेट्स आणि ‘इसिस’शी संबंधित काही दस्तावेज जप्त केले आहेत.
कसा आला जाळ्यात
एनआयएने ३ जुलै रोजी मुंबईतून चार जणांना अटक केली होती. त्यात तबिश नासेर सिद्दिकी, अबू नुसैबा आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांचा समावेश होता. त्यांच्या चौकशीतून पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख याला अटक केली होती. यानंतर डॉ. सरकार याचे नाव समोर आले. डॉ. सरकार हा तरुणांना इसिसमध्ये भरती करण्यासाठी प्रेरित करत होता.
कशी केली अटक
कोंढवा पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे म्हणाले, “एनआयएने सरकारला चौकशीसाठी बोलावले होते. एनआयएकडे त्याच्याविरोधात पुरावे होते. यामुळे त्याला अटक केली. डॉ. सरकार कोंढवा येथील परमार पवन हाऊसिंग सोसायटीत राहतो. हा फ्लॅट सरकारच्या वडिलांच्या नावावर आहे. सरकार देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप एनआयएने त्याच्यावर ठेवला आहे. त्याच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.