पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील अपघातांची धक्कादायक आकडेवारी समोर!
147 अपघातांमध्ये तब्बल 'इतक्या' जणांचा बळी! काय आहे अपघात होण्याचं प्रमुख कारण? उत्तर मिळालं!
पुणे : पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर अपघात कमी होण्याचं काही नाव घेत नाहीये. या वर्षातील सुरुवातीच्या 9 महिन्यांची एक्स्प्रेस हायवेवरील अपघातांची चिंताजनक आकडेवारी समोर आलीय. अवघ्या 9 महिन्यात मुंबई पुणे महामार्गावर एकूण 145 अपघातांची नोंद करण्यात आलीय. त्यातीर 44 अपघात गंभीर स्वरुपाचे होते. जानेवारी 2022 ते सप्टेंबर 2022 या 9 महिन्याच्या कालावधीत झालेल्या अपघातांची संख्या लक्षणीय आहे. या अपघातांमध्ये एकूण 47 प्रवाशांनी जीव गमावलाय. तर अनेकजण जायबंदी झालेत. या अपघातांचं प्रमुख कारण नेमकं काय आहे, हे देखील आता समोर आलंय.
कशामुळे वाढले अपघात?
पुणे मुंबई एक्स्प्रेस वर अपघात होण्याचं प्रमुख कारण हे वाहन चालकांचा बेशिस्तपणा असल्याचं दिसून आलं आहे. लेन कटिंग केल्यामुळे आणि लेनची शिस्त न पाळल्यामुळे बहुतांश अपघात झाले आहेत, असं समोर आलंय. या वाढत्या अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी चालकांनी लेनची शिस्त पाळण्याची गरज व्यक्त केली जातेय.
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर एक्स्प्रेस वे वरील अपघातांचं प्रमाण चिंताजनक असल्याचं मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान, यानंतर एक्स्प्रेस हायवेवरील होणारी वाहतूक नियमाप्रमाणे व्हावी, यासाठी काटेकोर उपाययोजना राबवली गेली होती.
वाहतूक पोलिसांनी नियमांचं पालन न करणाऱ्यांवर दंड आकारण्याच मोठ्या प्रमाणात सुरुवात केली होती. वाहतूक पोलिसांच्या सक्रियतेमुळे मोठ्या प्रमाणात दंडही वसूल करण्यात आला होता. मात्र ही कारवाई आता पुन्हा थंड पडल्याने सर्रासपणे वाहतूक नियम पायदळी तुडवले जात असल्याचं चित्र द्रूतगती महामार्गावर पाहायला मिळतंय.
मागील काही महिन्यात वेग मर्यादा न पाळणाऱ्या तब्बल 7 हजार 325 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान, 1 कोटी पेक्षा अधिक दंडात्मक कारवाई करण्यात आलेली.
संपूर्ण द्रूतगती महामार्गावर आता सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. तरी देखील वाहन चालकांमध्ये अजूनही जागरुकता पाहायला मिळत नसल्याने चिंता व्यक्त केली जाते आहे. वाढते अपघात रोखण्याचं मोठं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलंय.