Sharad mohol murder case | मामा गँगमधील मुलांवर शरद मोहोळचा विश्वास नव्हता, पण…
Sharad mohol murder case | पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पाच जानेवारी रोजी दुपारी हत्या झाली होती. या प्रकरणातील सहा आरोपींना आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे.
पुणे, दि. 11 जानेवारी 2024 | पुणे शहरात भरदिवसा कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या झाली. शरद मोहळ याची हत्या करणारे त्याच्याच गँगमधील लोक होते. त्यात मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानुगडे आहे. शरद मोहोळ याची हत्या करण्याचा कट त्यांनी अगदी नियोजनबद्ध रचला. कानुगडे यांनी त्याचा भाचा मुन्ना पोळेकर याच्यामार्फत शरद मोहोळ याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आधी मुन्ना याला शरद मोहोळ याच्या टोळीत घुसवले. मुन्ना आणि शरद मोहोळ यांचे घर जवळजवळ होते. शरद मोहोळ याच्यासोबत असलेल्या काही साथीदाराशी मुन्नाने जवळकी साधली. त्यांच्या मार्फत दोन-चार साथीदारांनी शरद मोहोळ याच्या टोळीत प्रवेश केला. परंतु शरद मोहोळ याचा मामा गँगमधील या पोरांवर विश्वास नव्हता. मुन्ना याने आपले काम सुरुच ठेवले आणि शरद मोहोळ याचा विश्वास संपादन केला.
कट शिजवत राहिला अन् शरद याला…
मुन्ना याने शरद मोहोळ याचा विश्वास मिळवल्यानंतर पुढील पाऊल टाकणे सुरु केले. त्याच्या डोक्यात सतत शरद याचा काटा काढण्याचा बेत घोळत होता. परंतु शरद मोहोळ याला मात्र या कटाची कानोकान खबर नव्हती. तो बिनधास्त होता. शरद मोहोळ मुन्ना याला नेहमी बॉडीगार्डप्रमाणे सोबत बाळगत होता. परंतु हाच बॉडीगार्ड एक दिवस आपणास संपवणार? याची खबर गुन्हेगारी विश्वातील डॉन असलेल्या शरद मोहोळ याला लागली नाही. त्याला कधी मुन्नावर शंकासुद्धा आली नव्हती. परंतु मुन्नाने मामा कानुगडेसाठी काहीही करण्याची तयारी करूनच ठेवली होती.
लग्नाचा वाढदिवशी साधला डाव
शरद मोहोळ याचा खून करण्याचे मुन्ना याने निश्चित केले. शरद याच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे शरद मोहोळ याच्या घरी त्याच्या माणसांची वर्दळ होती. जवळच्या लोकांचे जेवणखाण सुरू होते. त्यात मुन्नाही होता. पाच जानेवारी रोजी दुपारी एक वाजता मुन्ना आणि शरद मोहोळ याच्या घरी जेवण करायला बसला. जेवण झाल्यानंतर देवदर्शनाला शरद मोहोळ आणि मुन्ना एकत्रच बाहेर पडले. त्यावेळी शरद मोहोळ याचे नेहमीचे साथीदार नव्हते. मुन्ना याने हा मोका साधत त्याच्या साथीदारांसह हल्ला चढवला. त्याच्यावर धडाधड गोळ्या झाडून ठार केले.
सर्वांना मिळाली पोलीस कोठडी
शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणातील सहा आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सर्व आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली. पोलिसांना तपासामध्ये आरोपींकडे आणखीन तीन काढतुसे सापडली. मुन्ना याने या कटापूर्वी दोन तीन वेळा शरद मोहोळ याला एकटे पाडून मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी यश आले नव्हते. दरम्यान या प्रकरणात पिस्तूल पुरवणाऱ्या धनंजय मटकर आणि सतीश शेंडगे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
हे ही वाचा