क्रिकेट वर्ल्डकप दरम्यान फ्रेंचाइजीचे आश्वासन, अन् अशी करत गेला फसवणूक, एक कोटींचा गंडा
Pune Crime News : पुणे शहरातील एका उद्योजकाची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक फ्रेंचाइजी देण्याच्या आश्वासनावरुन झाली आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून हा सर्व फसवणुकीचा प्रकार झाला आहे.
पुणे : पुणे शहरात फसवणुकीचे अनेक प्रकार उघड होत आहेत. कधी युट्यूबच्या व्हिडिओला लाइक करण्याच्या माध्यमातून फसवणूक होत आहे तर कधी विद्यार्थ्यांना हॉस्टेल देण्याचा नावाखाली फसवणूक होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील ५० जणांना चारधाम यात्रेच्या नावावर फसवणूक झाली आहे. आता एका उद्योजकाची फसवणूक फ्रेंचाइजीच्या माध्यमातून झाली आहे. एक कोटी रुपयांच्या या फसवणूक प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे प्रकार
क्रिकेटचा ५० षटकांचा वर्ल्ड कप आता होणार आहे. या वर्ल्ड कप दरम्यान पुणे, मुंबई आणि पुणे विमानतळावर जागतिक दर्जाच्या पिझ्झा रेंस्टारंटची फ्रेंचाइज मिळवण्याच्या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे. पुणे येथील ३५ वर्षीय व्यक्तींची इंजिनिअरींग कंम्पोनट बनवण्याचा उद्योग आहे. त्यांना फूड आणि हॉस्पिटल उद्योगात गुंतवणूक करायची होती. त्यासाठी त्यांचा शोध सुरु होता. त्यांनी एका पिझ्झा चेनच्या वेबसाइटला भेट दिली. त्या वेबसाईटवरुन जून महिन्यात ऑनलाईन फॉर्म दाखल केला. त्यानंतर ९ जून रोजी त्यांना कंपनीकडून फोन आला. फोन करणारा व्यक्ती कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत होता.
अशी सुरु झाली फसवणूक
२१ जून रोजी त्यांना काही कागदपत्रे जमा करण्याचे अन् करार करण्यासंदर्भात पत्र मिळाले. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुरुवातील 2.65 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर एनओसीसाठी 6 लाख, 7.5 लाख मशीन खरदेसाठीची रक्कम मागण्यात आली. त्यानुसार ही रक्कम त्यांनी संबंधिताने दिलेल्या बँकेच्या खात्यात जमा केली. त्यानंतर 12 लाख रुपये करार पूर्ण करण्यासाठी, 20 लाख रुपये इंटेरियल डेकोरेशनसाठी रक्कम घेण्यात आली. वेगवेगळ्या नावाने महिन्याभरात सुमारे एक कोटी रुपये त्यांच्यांकडून घेण्यात आलेत. समोरच्या व्यक्तीकडून पैशांची मागणी वाढत गेली. पैसे वैयक्तीक खात्यात मागू लागला.
अन् घेतली पोलिसांत धाव
फ्रेचाइंजीच्या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपये संबंधित व्यक्तीने त्याना फ्रेंचाइज देणाऱ्यांना दिले. त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे त्यांना लक्षात आले. यामुळे त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.