Pune crime news : पुणे शहरात बांगलादेशी नागरिक, पोलिसांच्या कारवाईत किती जणांना झाली अटक
Pune crime news : पुणे शहरात देशभरातून नागरिक येत असतात. तसेच पुण्यात घुसखोरी करुन बेकायदेशीरित्या राहणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. पुणे पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई सुरु केली आहे. सोमवारी काही जणांना अटक केलीय.
पुणे | 12 सप्टेंबर 2023 : पुणे शिक्षण आणि उद्योगाचे माहेरघर बनले आहे. यामुळे पुणे शहरात देशभरातून नागरिक येतात. परंतु त्याचवेळी विदेशी नागरिक घुसखोरी करुन राहतात आणि बेकादेशीर व्यवसाय करतात. पुणे पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने राहणाऱ्या लोकांवर धडक कारवाई सुरु केली आहे. पंधरा दिवसांत पुण्यात दुसऱ्यांदा बांगलादेशी नागरिक सापडले आहे. यामुळे पुणे शहरात अनेक विदेशी नागरिक राहत असल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्वांना शोधून काढण्याचे आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे.
सात जणांवर केली कारवाई
पुणे शहरात अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. सहा महिलांसह एका अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या सामजिक सुरक्षा विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. या सर्व महिला पुण्यातील बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करण्यासाठी राहत होत्या. यासंदर्भातील माहिती पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक महिन्यांपासून हे सगळे बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहत होते.
पंधरा दिवसांत दुसरी मोठी कारवाई
गेल्या पंधरा दिवसांत पुणे पोलिसांनी दुसरी मोठी कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी बुधवार पेठ परिसरांमधूनच 19 बांगलादेशी लोकांना अटक केली होती. पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकानेच ही कारवाई केली होती. काही दिवसांपूर्वी सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने वेश्यावस्तीत छापा टाकला होता. त्यावेळी अटक केलेल्या 19 जणांवर परकीय नागरिक आदेश 1978 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिसांच्या फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांची ही मोहीम यापुढेही सुरु राहणार आहे.