Pune Crime : शिक्षिकेने तीन वर्षांच्या मुलीसोबत हे काय केले? प्रकरण गेले पोलिसांपर्यंत
Pune Crime News : पुणे शहरातील शाळेत एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका तीन वर्षाच्या मुलीसंदर्भात घडलेला हा प्रकार आहे. या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.
पुणे | 24 ऑगस्ट 2023 : घरीच खेळण्याच्या वयात पालक मुला, मुलींना शाळेत पाठवतात. मग नर्सरी, लोअर केजी, अपर केजी हा टप्पा पार केल्यानंतर मुले पहिलीत दाखल होतात. खरंतर पहिली प्रवेशाचे वय पाच किंवा साडेपाच वर्ष होते. पण 2020 साली लागू झालेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पहिल्या इयत्तेत प्रवेशाचे वय सहा वर्ष करण्यात आले. परंतु तिसरीत शाळेत गेलेल्या मुलीसंदर्भात धक्कादायक प्रकार घडला आहे. या लहान मुलीसोबत शिक्षिकेने जो प्रकार केला, त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले.
काय घडला प्रकार
पुणे शहरातील तीन वर्षाच्या मुलीने आपल्या वडिलांकडे तक्रार केली. शाळेतून घरी आल्यावर तिने वडिलांना सांगितले की, “शाळेत टीचर केस ओढतात, गालगुच्ची घेतात”. तसेच हा प्रकार घरी सांगायचा नाही. सांगितला तर तुझे हात कापेल, तुला मेणबत्तीचे चटके देईल, असे टीचरने म्हटले. हा प्रकार कोथरूड परिसरातील एका नर्सरीत घडला.
वडिलांनी केली पोलिसांकडे तक्रार
मुलीने केलेल्या तक्रारीनंतर वडिलांनी पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी त्या शिक्षिकेविरोधात तक्रार दिली. त्यानंतर कोथरूड पोलीस ठाण्यात 40 वर्षीय शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान कलम 323, 506 आणि ज्यूवेनाईल जस्टीस कायद्यानुसार हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पांढरे अधिक तपास करत आहेत. या शिक्षिकेविरोधात कारवाई देखील करण्यात आली आहे.
दरम्यान, शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे पालकवर्गही चिंतेता आला आहे. तीन वर्षांच्या निरागस मुलांचा शिक्षिकेकडून या पद्धतीने छळ होत असल्यास मुलींना शाळेत पाठवायचे की नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे.