Accident | चारचाकीची उभ्या आयशर ट्रकला धडक, भीषण अपघातात बहिण, भाऊ अन् भाचा ठार
Highway accident | महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बहिण, भाऊ अन् भाचा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव जाणारी कार उभ्या ट्रकवर आदळल्यामुळे हा अपघात झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी वाहतूक विस्कळीत झाली होती.
कराड | 14 ऑक्टोंबर 2023 : राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झाला आहे. पुणे-बेंगळुरु महामार्गावर शनिवारी अपघात झाला. महामार्गावर भरधाव जाणाऱ्या चार चाकीने उभ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात बहिण, भाऊ अन् भाचा यांचा मृत्यू झाला आहे. त्यात कोल्हापूर येथील पोलिसाचा समावेश आहे. कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे ही घटना घडली. राष्ट्रीय महामार्गावर अपघात होण्याची साखळी सुरुच आहे. राज्यात रस्ते अपघातात मृत्यू होण्याची संख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
कसा घडला अपघात
पुणे-बंगळूर महामार्गावर कराड तालुक्यात असलेल्या पाचवड फाटा येथे हा अपघात झाला. महामार्गावर असलेल्या भाग्यलक्ष्मी हॉटेलजवळ आयशर ट्रक बाजूला उभा होता. त्यावेळी कोल्हापूरकडून पुणे शहराकडे भरधाव वेगाने निघालेल्या कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला. या अपघातात बहिण, भाऊ आणि भाचा जागीच ठार झाला आहे. अपघात झाला त्यावेळी नितीन पोवार हे स्वतः चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. 14 ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
तिघे जण एकाच कुटुंबातील
भीषण अपघातामध्ये नितीन पोवार यांच्यासह त्यांची बहिण आणि भाचा असे तिघेजण जागीच ठार झाले. नितीन बापूसाहेब पोवार (वय 34) यांची बहिण मनीषा आप्पासाहेब जाधव (वय 31) आणि भाचा अभिषेक जाधव आहे. या तिघांचा अपघातात मृत्यू झाला. अपघात झाला तेव्हा नितीन पोवार स्वत: गाडी चालवत होते. ते कोल्हापूर येथे पोलीस दलात कार्यरत होते.
अपघातानंतर वाहतूक विस्कळीत
अपघातानंतर महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. अपघाताची माहिती मिळताच कराड पोलीस त्वरित घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. तसेच घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. दरम्यान या अपघाताची माहिती समजताच कोल्हापूर पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.