Video | ज्या वॉचमनकाकांकडे डुग्गूला सोडलं, त्यांनी टीव्ही 9शी बोलताना काय सांगितलं?
पुण्यातील बालेवाडी परिसरातून आठवड्यापूर्वी स्वर्णव चव्हाण या मुलाचे अपहरण झाले होते. त्यानंतर आज त्याला पिंपरी चिंचवडमधील लोटस पब्लिक स्कुलजवळ असलेल्या एका इमारतीजवळ आणून सोडण्यात आले.
पुणेः पुण्यातील बालेवाडी परिसरातून आठवड्यापूर्वी स्वर्णव चव्हाण या मुलाचे अपहरण झाले होते. त्यानंतर आज त्याला पिंपरी चिंचवडमधील लोटस पब्लिक स्कुलजवळ असलेल्या एका इमारतीजवळ आणून सोडण्यात आले. इमारतीजवळ असलेल्या ज्या वॉचमनकाकांकडे स्वर्णवला सोडण्यात आले त्यांनी तो रडू लागला म्हणून त्यांच्याजवळ असलेल्या तानाजी गिरकारांना डूग्गूची माहिती सांगितली. वॉचमनकाकांना मोबाईलमधील काही कळत नाही म्हणून त्यांनीच गिरकरांना डूग्गूच्या बॅगेत फोन नंबर वगैरे आहे का ते बघण्यास सांगितले. यावेळी डूग्गूच्या बॅगेत त्याच्या वडिलांचाच मोबाईल नंबर मिळाला. त्यानंतर सुरू झाला त्याच्या आई वडिलांचा शोध.
स्वर्णव आता त्याच्या आई वडिलांच्या मायेच्या कुशीत असला तरी वॉचमनकाकांच्या सतर्कतेमुळेच त्याच्या आई वडिलांचा शोध घेणे सोपे झाले. तोंडाला मास्क लावून कुणीतरी येऊन वॉचमन काकांना सांगितले की या मुलाला जरा येथे बसू द्या, जाऊन आलो. असा सांगणाराच अपहरणकर्ता होता. आणि तो अपहरणकर्ता निघूनही गेला. अपहरणकर्ता निघून जात असतानाच तो मुलगा रडू लागल्याचे वॉचमनकाका सांगतात. मुलाला आणून सोडताना अपहरणकर्त्याच्या तोंडाला मास्क होते आणि डोळे सोडून सगळा झाकलेला होता असे वॉचमनकाका सांगतात. दहा मिनिटानंतर मुलगा रडू लागल्यानंतर वॉचमन काकांनी त्या मुलाला जवळच असलेल्या तानाजी गिरकरकडे घेऊन गेले. यावेळी वॉचमनकाकांनी तानाजी गिरकरांना सांगितले की, या मुलाला इथे कुणीतरी आणू सोडले आहे. आणि तो रडू लागला आहे.
स्वर्णव रडू लागल्यानंतर त्याच्याजवळ असलेल्या बॅगेमध्ये फोन नंबर आहे का याचा शोध गिरकरांनी घेतला. यावेळी डूग्गूच्या बॅगेत मिळालेल्या फोन नंबरवर फोन केल्यानंतर तो त्याच्या वडिलांचाच असल्याचे कळले. यानंतर डूग्गू्च्या वडिलांनी त्यांना व्हिडिओ कॉल करण्यास सांगितल्यानंतर तो आपलाच मुलगा असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना त्या ठिकाणचे लोकेशन पाठवून माहिती देण्यात आली. डूग्गूच्या वडिलांबरोबरच दहा पंधरा मिनिटात त्या ठिकाणी पोलीसही दाखल झाले.
पोलिसांची संयुक्त कारवाई
पोलीस दाखल झाल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही व्हिडिओ तपासून संबंधित अपहरणकर्त्याचा शोध मोहिम चालू केल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी सांगितली. ही तपास मोहिम पिंपरी चिंचवड पोलीस आणि पुणे पोलिसांकडूस संयुक्तपणे सुरू आहे.
संबंधित बातम्या