सासरवाडीत शेतात फिरायला गेला होता, अज्ञातांनी काटा काढला; पोलीस तपासात जे पुढे आलं ते पाहून पोलीसही चक्रावले !
नवविवाहित जावई सासरवाडीत आला होता. पती-पत्नी दोघे शेतात फिरायला गेले होते. मात्र शेतात जे घडले त्याने सर्वांनाच धक्का बसला.
पुणे : सुट्टीच्या दिवशी सासरवाडीत आलेल्या जावयाची अज्ञात आरोपींनी हत्या केल्याची घटना पुण्याच्या मावळमधील गहुंजे येथे घडली. मात्र या हत्याकांडाला आता वेगळे वळण लागले आहे. हत्याकांडाचा तपास सुरु केल्यानंतर तपासात जे उघड झाले ते पाहून पोलीसही चक्रावले. वारंवार होत असलेला शारीरिक छळ, मारहाण याला कंटाळून पत्नीनेच पतीची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. तपासानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ही माहिती दिली. याप्रकरणी हत्या झालेल्या सुरजच्या पत्नीला तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या हत्या प्रकरणात नेमक्या किती आरोपींचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलीस तपासात पत्नीचा बनाव उघड झाला
अगोदर पतीला अज्ञात तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा बनाव पत्नीने रचला होता. परंतु, पोलिसांपुढे हा बनाव जास्त काळ टिकू शकला नाही. अखेर तिने आपला गुन्हा कबूल करत स्वतः हत्या केल्याचे पोलिसांकडे मान्य केले. विशेष म्हणजे दोघांचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मयत सूरज हा एका कॉलेजमध्ये काम करत होता.
छळ करायचा म्हणून काटा काढला
लग्नानंतर सूरज पत्नीचा शारीरिक छळ करायचा, तिला मारहाण करायचा, असा पत्नीचा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून पत्नीने पतीचा काटा काढण्याचा कट आखला. त्यानुसार सुट्टीअसल्याने रविवारी सूरज सासरवाडीत आला असता पत्नी त्याला सोबत घेऊन फिरायला गेली. मग तेथून शेतात घेऊन गेली. तिथे आरोपी आधीच दबा धरुन बसले होते. तेथे आरोपींनी त्याला गाठले आणि त्याच्यावर हल्ला करत त्याची हत्या केली.
पोलिसांकडून आरोपीला अटक
घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करत पुढील तपास सुरु केला. लूटमार करण्याच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. मात्र पत्नीकडे वारंवार चौकशी केल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.