भाजप आमदाराचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा, पत्नीनेच दिली हत्येची सुपारी
भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात पोलीस तपासातून खळबळजनक माहिती समोर येत आहे. सतीश वाघ यांची सुपारी त्यांच्या बायकोनेच दिली होती, असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
पुण्यातील भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासात अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. सतीश वाघ यांची हत्या करणारा शेजारची व्यक्ती असल्याची आधी चर्चा होती. पण आता पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, सतीश वाघ यांच्या घरातील त्यांच्या चिरसंगिनी असलेल्या पत्नीनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हा सर्व प्रकार झाल्याचे समोर येत आहे. पोलीस तपासात या बाबी समोर आल्या आहेत. या घटनेप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे.
भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे उद्योजक होते. ते 9 डिसेंबरला पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. या दरम्यान ब्ल्यू बेरी हॉटेल बाहेर चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवत त्यांचं अपहरण केलं होतं. ही अपहरणाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता. या दरम्यान त्याच दिवशी रात्री एका ठिकाणी घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता. सतीश वाघ यांची अपहरणानंतर लगेच त्याच गाडीत चाकूने भोसकून, 72 वेळा वार करुन हत्या केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांचा युद्ध पातळीवर तपास सुरु होता.
पोलिसांनी आरोपींचा शोध कसा घेतला?
या प्रकरणावरुन विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात होता. तर दुसरीकडे पोलिसांचा तपास सुरु होता. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली होती. यासाठी पोलिसांनी पुणे-सोलापूर मार्गावरील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. या तपासातून चार आरोपींना अटक करण्यात आली. यानंतर सतीश वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्या भाडेकरुने त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली होती. आरोपी भाडेकरुने सतीश वाघ यांच्या हत्येसाठी आरोपींना 5 लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली होती.
या प्रकरणी पोलिसांनी तपास करत धाराशिवमधून एका आरोपीला नुकतंच अटक केली होती. त्याच्या चौकशीनंतर आता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाल्याची शक्यता आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच प्रेम प्रकरणातून आपल्या पतीच्या हत्येची सुपारी दिली होती, अशी धक्कादायक माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे.