जवानाच्या आई-वडिलांची आत्महत्या, दोन झाडांना गळफास घेत आयुष्य संपवलं
सुरजाराम (वय 45 वर्ष) आणि त्यांची पत्नी तीजू देवी (वय 42 वर्ष) हे मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्या शेतात गेले, तिथे त्यांनी दोन झाडांवर गळफास घेतला. दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
जयपूर : राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात एका मध्यमवयीन जोडप्याने दोन झाडांना गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या त्यांच्या मुलाची सध्या जैसलमेरमध्ये पोस्टिंग आहे. जोडप्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
काय आहे प्रकरण?
सुरजाराम (वय 45 वर्ष) आणि त्यांची पत्नी तीजू देवी (वय 42 वर्ष) हे मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्या शेतात गेले, तिथे त्यांनी दोन झाडांवर गळफास घेतला, असे लाडनुन पोलीस स्टेशनचे अधिकारी राजेंद्र सिंह यांनी सांगितले.
“दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही. त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही विवाहित आहेत. मुलगा भारतीय सैन्य दलात असून जैसलमेरमध्ये तैनात आहे. ही घटना घडली तेव्हा त्याची पत्नी तिच्या पालकांच्या घरी होती” अशी माहिती पोलिसांनी दिली. शव विच्छेदनानंतर दोघांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले, असेही पोलिसांनी सांगितले.
नांदेडमध्ये प्रेमविवाह केलेल्या जोडप्याची आत्महत्या
दुसरीकडे, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका गेल्या वर्षी पती पत्नीच्या आत्महत्येने हादरुन गेला होता. प्रेमविवाह केलेल्या जोडप्याने ऐन दिवाळीत आत्महत्या केली होती. त्यामुळे त्यांची दोन मुले पोरकी झाली होती.
काही दिवसांपासून या जोडप्यामध्ये भांडणं सुरु असल्याचं बोललं जात होतं. दिवाळसणासाठी औरंगाबादहून आपल्या गावी आलेल्या या जोडप्यात संशयामुळे वाद झाला होता. त्या वादाचं पुढचं टोक थेट आत्महत्या ठरलं.
पत्नीला घेऊन पती कळमनुरी तालुक्यातील भुवनेश्वर इथे गेला. तिथे गेल्यावर त्याने विषारी औषध घेऊन जीवन संपवले तर त्याच परिसरात प्रमिलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आठ दिवसानंतर आढळला.
साता जन्माच्या साथीच्या आणाभाका घेतलेल्या जोडप्याने थेट आत्महत्येचं पाऊल उचललं. ऐन दिवाळीत आई बाबांच्या आत्महत्येने दोन्ही मुलं कायमची पोरकी झाली.
गडचिरोलीत आई-वडिलांसह मुलाची आत्महत्या
दुसरीकडे, मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने संपूर्ण कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार काही महिन्यांपूर्वी गडचिरोलीत घडला होता. एकाच कुटुंबातील तिघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने, आई, वडील आणि भावाने आत्महत्या केली होती.
रवींद्र नागोराव वरगंटीवार (50), वैशाली रवींद्र वरगंटीवार (43) आणि साईराम रवींद्र वरगंटीवार (19) अशी आत्महत्या केलेल्यांची नावं होती. वरगंटीवार यांच्या 24 वर्षीय मुलीने अन्य जातीतील मुलाशी लग्न केल्याच्या रागातून, आई, वडील आणि भावाने आत्महत्या केल्याचा दावा केला जात होता.
रवींद्र वरगंटीवार यांच्या मुलीचे अन्य जातीतील मुलासोबत प्रेमसंबंध होते. मुलीने प्रेम विवाह करण्यासाठी वडिलांची परवानगी मागितली. मात्र, घरच्यांना ही बाब मान्य नसल्याने त्यांनी नकार दिला. पण, प्रेमविवाह करणार असल्याचे ठामपणे सांगून संबंधित मुलगी शनिवारी सायंकाळी पळून गेली. यानंतर तिने मार्कंडादेव मंदिरात विवाह केल्याचं घरच्यांना समजलं. या प्रकाराने वरगंटीवार कुटुंब अस्वस्थ होतं. अनेकांनी त्यांची समजूत काढली, मात्र त्यांचा राग कायम होता. यात रागाच्या तणावातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं.
संबंधित बातम्या :
दोन मुलांचा आजारपणामुळे मृत्यू, पुण्यात 40 वर्षीय पित्याची गळफास घेत आत्महत्या
मुलीने पळून जाऊन लग्न केल्याचा राग, आई-वडील, भावाची विहिरीत उडी मारुन आत्महत्या
विहिरीकाठी चपला काढल्या, मोबाईल-पैसे ठेवले, पुण्यात बापाची दोन लेकींसह आत्महत्या