अशी लूट कधीच झाली नसेल… थुंकला अन् साडे तीन लाखाची कॅश उडवली; अशी काय शक्कल लढवली?
चोर कधी काय करतील याचा भरवसा नाही. कधी कोणती शक्कल लढवतील हे सांगता येत नाही. फक्त काही मिनिटाचा अवकाश की भली मोठी चोरी होते. आपण लुटलोय हे लोकांना कळतही नाही. अशाच एका चोरीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
समस्तीपूर | 5 ऑक्टोबर 2023 : बिहारच्या समस्तीपूरमध्ये दिवसाढवळ्या अजब चोरी झाली आहे. एक दोन हजाराची नव्हे तर साडे तीन लाखांची चोरी झाली आहे. एक चोर एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर थुंकला. त्यानंतर तो त्या व्यक्तीला वारंवार सॉरी म्हणाला. कपड्यावर थुंकल्यामुळे त्याने या बुजुर्ग व्यक्तीला हँडपंपवर थुंकी स्वच्छ करण्यासाठी नेलं. हा ज्येष्ठ नागरिक जेव्हा हँडपंपावर थुंका स्वच्छ करत होता तेव्हा थुंकणाऱ्या चोराचा दुसरा साथीदार आला आणि जे घडायला नको होतं तेच घडलं. या दुसऱ्या साथीदाराने कशी केली साडेतीन लाखांची चोरी? काय घडलं त्या हँडपंपवर?…
या ज्येष्ठ नागरिकाने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आहे. पोलीस या अनोख्या चोरीचा तपास करत आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. आता हे सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरांची ओळख पटवली जात आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. समस्तीपूर जिल्ह्यातील मुफ्फसिल पोलीस आता या चोरीचा तपास करत आहेत.
बाईकवरून आले आणि…
ज्या ज्येष्ठ नागरिकाचे साडे तीन लाख रुपये चोरले गेले. त्याचं नाव चंद्रशेखर राय असं आहे. ते जितवारपूर येथील रहिवासी आहेत. जुन्या पोस्ट ऑफिस रोडवरील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून त्यांनी साडेतीन लाख रुपये काढले होते. हे पैसे घेऊन ते सायकलने घरी जात होते. चंद्रशेखर राय गोला रोडजवळ आले तेव्हा बाईकवरून आलेले दोन तरुण चंद्रशेखर राय यांच्या अंगावर थुंकले. त्यामुळे चंद्रशेखर राय भडकले. त्यांच्यात आणि या दोन तरुणांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
अन् दुसरा तरुण आला…
त्यानंतर बाईकवरील एक तरुण खाली उतरला. तो चंद्रशेखर राय यांच्याकडे गेला आणि सॉरी सॉरी म्हणून लागला. आमच्याकडून चूक झाली. चला तुमचे कपडे धुवून देतो, अशी गयावया तो करू लागला. चंद्रशेखर राय यांना वाटलं या तरुणाला पश्चात्ताप झाला आहे. त्यामुळे तो मला हँडपंपवर येण्याचा आग्रह करत आहे. चंद्रशेखर रायही त्याच्यासोबत हँडपंपावर गेले. चंद्रशेखर राय यांनी त्यांची सायकल बाजूला उभी केली. पैसे असलेली थैली हँडपंपाजवळ ठेवली. आणि शर्टावरील थुंकी पाण्याने साफ करू लागले. यावेळी पाठीमागून दुसरा तरुण आला आणि पैशाने भरलेली ही थैली घेऊन पसार झाला.
सीसीटीव्ही कॅमेरे…
या घटनेनंतर चंद्रशेखर राय चांगलेच हादरून गेले. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अंगावर थुंकण्याच्या बाहण्याने लूट केल्याचं प्रकरण आमच्याकडे आलं आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जात आहे. या चोरांना लवकरात लवकर पकडलं जाईल. आम्ही या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे, असं पोलीस निरीक्षक विक्रम आचार्य यांनी सांगितलं.