आलिशान हॉटेलमध्ये सुट्ट्यांसाठी गेलेल्या कुटुंबातील चौघांचा मृत्यू, तीन ठिकाणी चौघांचे मृतदेह
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये राहणारे एक वृद्ध जोडपे त्यांच्या मुलांसह सुट्टीच्या दिवशी अल्बेनियाला गेले होते. तिथे त्यांनी एका आलिशान हॉटेलमध्ये रुम बुक केली. चेक-इन केल्यानंतर, कुटुंबाने खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली आणि ते सौना कॉम्प्लेक्समध्ये गेले
मॉस्को : रशियाहून (Russia) अल्बानियाला (Albania) सुट्टीसाठी गेलेले कुटुंब हॉटेलमध्ये मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लक्झरी हॉटेलमध्ये चेक-इन केल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा हॉटेल कर्मचारी त्यांची ऑर्डर घेऊन रुममध्ये पोहोचले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. अल्बेनियाला पोहोचल्यानंतर रशियन कुटुंब थकवा दूर करण्यासाठी स्टीम बाथ घ्यायला हॉटेलच्या सौना कॉम्प्लेक्समध्ये गेले होते. तिथेच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला.
काय आहे प्रकरण?
या घटनेत एकाच कुटुंबातील चौघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये राहणारे एक वृद्ध जोडपे त्यांच्या मुलांसह सुट्टीच्या दिवशी अल्बेनियाला गेले होते. तिथे त्यांनी एका आलिशान हॉटेलमध्ये रुम बुक केली. चेक-इन केल्यानंतर, कुटुंबाने खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली आणि ते सौना कॉम्प्लेक्समध्ये गेले. काही वेळानंतर, हॉटेल कर्मचारी जेवण घेऊन पोहोचले, तेव्हा त्यांना सर्वजण मृतावस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच हॉटेल कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.
नेमकं काय घडलं?
हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की रशियन कुटुंबाने सौना कॉम्प्लेक्समध्ये जाण्यापूर्वी काही खाद्यपदार्थ ऑर्डर केले होते आणि काही वेळानंतर ते आणण्यास सांगितले होते. कदाचित स्टीम बाथ सुरु असतानाच त्यांचा श्वास गुदमरला असावा आणि या अपघातात चौघांचाही मृत्यू झाला असावा. प्राथमिक तपासात पोलिसांना आढळले, की सौना कॉम्प्लेक्सची वेंटिलेशन यंत्रणा योग्यरित्या काम करत नाही आणि यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज आहे.
हॉटेलमध्ये तीन ठिकाणी चौघांचे मृतदेह
पोलिसांनी अहवालात नमूद केले आहे की हे कुटुंब हॉटेलमध्ये पोहोचून फक्त एक तास झाला होता. व्हेंटिलेशन सिस्टीम योग्यरित्या का काम करत नाही हे शोधण्यासाठी पोलीस हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत. पोलिसांनी सांगितले की कुटुंबातील एका सदस्याचा मृतदेह सनबेडवर पडलेला होता, तर दोघे सॉना बेंचवर होते, तर एक जण पूलमध्ये मृतावस्थेत पडला होता.
संबंधित बातम्या :
वसईत पोलिसांची दादागिरी; दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
यॅक यॅक, ईsss तुमचा आवडता समोसा कसा बनवला जातोय बघा, कल्याणच्या हॉटेलचा Video व्हायरल