Kranti Redkar | समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरला धमक्या; पोलीस आयुक्तांना लिहिणार पत्र
समीर वानखेडे यांच्याकडे एनसीबीच्या मुंबई विभागीय संचालकपदाची जबाबदारी असताना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या 'कॉर्डेलिया' क्रूझवर छापा घातला होता. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही ताब्यात घेण्यात आलं होतं.
मुंबई : एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांची भ्रष्टाचारप्रकरणी सलग दोन दिवस सीबीआयकडून चौकशी झाली. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या कुटुंबीयांकडून 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली वानखेडे यांच्यासह पाच जणांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. ही चौकशी सुरु असतानाच वानखेडेंनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना दिलासा देत प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठवलं. मुंबई उच्च न्यायालयात वानखेडे यांच्या वतीने आर्यन खान प्रकरणात लाचखोरी आणि खंडणीचे आरोप फेटाळण्यात आले. यासाठी दिलेल्या पुराव्यात त्यांनी शाहरुख खानसोबतचं संभाषणही सादर केलं. न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण देत सीबीआयच्या चौकशीला सामोरं जाण्याचे निर्देश दिले. याप्रकरणी आज (सोमवार) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सर्व घडामोडींदरम्यान वानखेडेंची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरला धमक्या मिळत असल्याची माहिती समोर येत आहे.
समीर वानखेडे आणि क्रांती रेडकरला धमक्या
मला आणि माझ्या पत्नीला गेल्या चार दिवसांपासून धमक्या मिळत असल्याची तक्रार, वानखेडेंनी केली आहे. “मी मुंबई पोलीस आयुक्तांना याविषयी पत्र लिहिणार आहे आणि विशेष सुरक्षेची मागणी करणार आहे”, असंही त्यांनी स्पष्ट केलं. क्रांतीने याआधी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली होती. “त्यांच्याविरोधातील सर्व आरोप खोटे आहेत, हे प्रत्येकाला माहित आहे. हे फक्त आरोप आहेत आणि आम्ही सीबीआयच्या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत आहोत. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करतोय”, असं क्रांती म्हणाली होती.
नेमकं काय आहे प्रकरण?
समीर वानखेडे यांच्याकडे एनसीबीच्या मुंबई विभागीय संचालकपदाची जबाबदारी असताना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या ‘कॉर्डेलिया’ क्रूझवर छापा घातला होता. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याला सोडवण्यासाठी वानखेडेंनी 25 कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. या आरोपप्रकरणी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केलीहोती. या चौकशीच्या आधारावर सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासा देत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं होतं. त्यानंतर ते शनिवारी सीबीआयच्या चौकशीला सामोरं गेले होते. सीबीआयने याप्रकरणी वानखेडेंची शनिवारी आणि रविवारी चौकशी केली होती.