सोन्याची बनावट नाणी विकणाऱ्या संजय कार्लेचा मृतदेह आढळला; दोन दिवस अलिशान कारमध्ये बॉडी पडून
संजयवर अनेक गुन्हे दाखल झाल्यानं त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. तो पोलिसांच्या अटकेत ही होता. सहा महिन्यांपूर्वीच तो पॅरोलवर बाहेर आला होता.
पनवेल: मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीमध्ये दोन दिवसापासून उभ्या असलेल्या ऑडी कारमध्ये एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कर्नाळा खिंड येथे या गाडीत मृतदेह सापडला आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी हा मृतदेह बाहेर काढून फारेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. हा मृतदेह संजय कार्लेचा असल्याचं सांगितलं जात आहे. सोन्याची बनावट नाणी विकून कार्ले अनेकांची फसवणूक करायचा. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पनवेल-पेण रोडवरील तारा गावच्या हद्दीत एका लाल रंगाच्या ऑडीतमृतदेह असल्याचे दिसून आल्याने खळबळ माजली आहे. गाडी क्रमांक एमएच 14 जीए 9585 ही गाडी कागदोपत्री पुणे जिल्ह्यातील तेजस प्रकाश साळवे यांच्या मालकीची दिसत आहे.
ही कार तारा गावच्या हद्दीत एका फार्म हाऊस समोर गेल्या दोन दिवसापासून उभी आहे. या कारमध्ये एका पुरुषाचा मृतदेह असून त्याने अंगावर टीशर्ट, जीन्स पॅन्ट घातलेली आहे. पायात स्पोर्ट्स शूज दिसत होते. सापडलेला मृतदेह नक्की कोणाचा? या प्रश्नाने आधी पोलीस चक्रावून गेले.
बंद गाडीत मागच्या सीटखाली मृतदेह कोंबलेल्या अवस्थेत होता. हा मृतदेह संजय कार्लेचा असल्याचं सूत्रांनी सांगितलं. संजय हा मूळचा पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आहे. सोन्याची बनावट नाणी विकून तो अनेकांची फसवणूक करायचा.
संजयवर अनेक गुन्हे दाखल झाल्यानं त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. तो पोलिसांच्या अटकेत ही होता. सहा महिन्यांपूर्वीच तो पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर त्याच्या हत्येचीच बातमी समोर आल्याने खळबळ उडाली आहे.