झटपट श्रीमंत होण्यासाठी मालकाच्या तिजोरीवर डल्ला, वांद्रे पोलिसांकडून नोकराला बेड्या
मालकाची श्रीमंती पाहून नोकराला हाव सुटली. मग त्याला झटपट होण्याची स्वप्न पडू लागली. यासाठी त्याने मालकाच्या तिजोरीवरच डल्ला मारला.
मुंबई : झटपट श्रीमंत होण्यासाठी नोकरानेच मालकाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याची घटना वांद्रे येथे घडली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसात चोरीची घटना दाखल करण्यात आली. वांद्रे पोलिसांनी वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातून आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीला गेलेला 90 टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. जिवाजी पारूनाथ ठाणेकर असे 43 वर्षीय अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. आरोपीने याआधीही असा गुन्हा केला का याबाबतही पोलीस तपास करत आहेत.
झटपट श्रीमंत होण्यासाठी निवडला चोरीचा मार्ग
आरोपी जिवाजी ठाणेकर हा वांद्रे येथील फिर्यादी गेवन ऑब्रियो यांच्या घरी नोकर म्हणून काम करत होता. मालकाची संपत्ती पाहून ठाणेकर याची नियत फिरली. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने मालकाच्याच तिजोरीवर डल्ला मारण्याचा कट आखला. त्यानुसार त्याने मालकाच्या तिजोरीतील सोन्याचे दागिने, अमेरीकन चलनातील एकूण 380 डॉलर असा एकूण 3,90,400 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला.
आरोपीला वांद्रे स्थानकातून अटक
तिजोरीतील मुद्देमाल चोरी झाल्याचे ऑब्रियो यांच्या लक्षात येताच त्यांनी वांद्रे पोलिसात धाव घेत नोकराविरोधात तक्रार दाखल केली. मालकाच्या फिर्यादीवरुन नोकराविरोधात कलम 381 अन्वये गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. आरोपीचा कसून शोध घेत पोलिसांनी वांद्रे रेल्वे स्थानकातून आरोपीला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
वांद्रे पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आचरेकर, सहाय्यक फौजदार रमेश पेडणेकर, पोलीस हवालदार राजू तोडगे, पोलीस शिपाई मकानदार, पोलीस शिपाई सांगवे, पोलीस शिपाई गायकवाड, पोलीस शिपाई चतूर आणि पोलीस शिपाई लहाने यांनी ही कामगिरी पार पाडली.