Crime : विनाकपड्यांवरच महिलेची चौकशी, आता भरावी लागणार २२ कोटींची नुकसानभरपाई!
एका कृष्णवर्णीय महिलेशी गैरवर्तन पोलिसांना महागात पडलंय. या प्रकरणात न्यायालया(Court)नं महिलेला जवळपास 22 कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय दिलाय. अमेरिकेतल्या शिकागो (US, Chicago) इथलं हे प्रकरणआहे.
शिकागो (अमेरिका) : एका कृष्णवर्णीय महिलेशी गैरवर्तन पोलिसांना महागात पडलंय. याप्रकरणी पीडित महिलेनं पोलिसांविरुद्ध न्यायालयात फिर्याद दिली. आता या प्रकरणात न्यायालया(Court)नं महिलेला 2.9 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 22 कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय दिलाय. पाहुया, नेमकं काय प्रकरण आहे ते…
महिला एक सामाजिक कार्यकर्ती अमेरिकेतल्या शिकागो (US, Chicago) इथलं हे प्रकरणआहे. याठिकाणी 2019मध्ये एका गुन्हेगाराच्या शोधात काही पोलीस अधिकारी कृष्णवर्णीय अँजेनेट यंग (Anjanette Young) यांच्या घरात जबरदस्तीनं घुसले. अँजेनेट या सामाजिक कार्यकर्त्या (Social Worker) आहेत. त्यावेळी त्या कपडे बदलत होत्या. मात्र पोलिसांनी कशाचाही विचार न करता त्यांना त्याच अवस्थेत उभं केलं. बेड्या ठोकून सुमारे अर्धा तास चौकशी केली. विशेष म्हणजे पोलीस शोधत असलेला गुन्हेगार अँजेनेट यांच्या घरात नसून शेजारच्या घरात राहत असल्याची माहिती मिळाली. या घटनेमुळे अंजनेट यंग यांना अत्यंत अपमानित वाटलं.
12 पोलिसांना केलं प्रतिवादी अँजेनेट यंग यांनी फेब्रुवारी 2021मध्ये यासंबंधी खटला दाखल केला, पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याशी गैरवर्तन केलं आणि आपला अपमान केल्याचा आरोप त्यांनी केलाय. या खटल्यात त्यांनी 12 पोलिसांना प्रतिवादी केलं. आता या प्रकरणाची सुनावणी झालीय. न्यायालयानं आपल्या निर्णयात म्हटलंय, की माहिती देणाऱ्याच्या माहितीची पडताळणी करण्यात पोलिसांना अपयश आलं. यामुळे महिलेला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. पोलिसांच्या गैरवर्तनासाठी महिलेला 2.9 दशलक्ष डॉलर नुकसानभरपाई देण्याचा निर्णय न्यायालयानं दिलाय.