भर कोर्टात शिवसेना पदाधिकाऱ्याकडून आरोपींना मारहाण, नेमकं काय घडलं?
अहमदनगरमध्ये एक वेगळाच प्रकार बघायला मिळाला. पोलीस आरोपींना घेऊन कोर्टात आले तेव्हा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने आरोपींना मारहाण करण्यास सुरुवात केली. संबंधित प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली.
अहमदनगर | 16 ऑगस्ट 2023 : शिवसेना शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने भर न्यायालयात आरोपींना चोप दिल्याचा प्रकार अहमदनगमध्ये बघायला मिळाला आहे. पोलिसांनी संबंधित शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. पण या प्रकारामुळे न्यायालयात एकच खळबळ उडाली होती. अटकेतील आरोपींनी स्वातंत्र्यदिनी देशविरोधी घोषणाबाजी केली होती. यावरुन चिडलेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने आरोपींना भर न्यायालयात चोप दिला. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या या कृत्याची गंभीर दखल न्यायालयाकडून घेण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
भारत विरोधी घोषणाबाजी करणाऱ्या युवकांना अहमदनगर जिल्हा न्यायालयात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या युवा पदाधिकाऱ्याने चोप दिला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे न्यायालयात एकच गोंधळ उडाला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेच्या शिंदे गटाचा युवा संघटक अमोल हुंबे यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी भुईकोट किल्ला परिसरात पाच मुलांकडून आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आली. याप्रकरणी लष्करी जवानांनी तीन जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. तर भिंगार कॅम्प पोलिसांकडून दोघांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आलं. लष्करी जवानांकडून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. या पाच आरोपींपैकी यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. दोन आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता हा प्रकार घडला.
न्यायालयाच्या आदेशानंतर शिंदे गटाचा युवा संघटक अमोल हुंबे यांना ताब्यात घेण्यात आलं. पण त्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणखी आक्रमक झाले. ते भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात ठाणू मांडून होते. अहमदनगर जिल्ह्यात कुणी महापुरुषांचा अपमान करत असेल किंवा देशविरोधी कृत्य करत असेल तर त्याला अशाच पद्धतीने शिवसेना स्टाईल उत्तर दिलं जाईल, असा इशारा या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.