भंगार वेचणं जीवावर बेतलं… मेट्रोचं प्रचंड वजनाचं बॅरेकेटिंग अंगावर पडल्याने महिला प्राणाला मुकली
या महिलेच्या अंगावर बॅरेकेटिंग पडल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे टीडीआरएफ जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या महिलेचा मृतदेह बाहेर काढला.
निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे: ठाण्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. भंगार वेचण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या अंगावर मेट्रोचे बॅरेकेटिंग पडला. प्रचंड वजनाचा हा बॅरेकेटिंग पडल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच हळहळ व्यक्त केली जात असून मेट्रोच्या कामावरही प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
आज सकाळी ही दुर्देवी घटना घडली. ठाण्यातील कॅडबरी जंक्शन ते कापूरबावडी येथे मेट्रोचं काम सुरू आहे. तिथे मेट्रोच्या खांबाना बॅरेकेटिंग लावण्यात आले आहेत. कॅडबरी जंक्शन येथेच सर्व्हिस रोडवरील हॉटेल उत्सव समोर ही धक्कादायक घटना घडली.
या ठिकाणी ही महिला भंगार वेचण्यासाठी आली होती. त्यावेळी तिचा तोल गेल्याने अचानक तिच्या अंगावर मेट्रोचे बॅरेकेटिंग पडले. या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. सुनीता बाबासाहेब कांबळे असं या मृत महिलेचं नाव आहे. ती लोकमान्य नगर येथे राहते.
या महिलेच्या अंगावर बॅरेकेटिंग पडल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे टीडीआरएफ जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या महिलेचा मृतदेह बाहेर काढला.
या महिलेचा मृतदेह ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात नेण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात येणार आहे. याप्रकरणी राबोडी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
ही महिला मेट्रोचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आली होती. भंगार वेचत असताना अचानक तिच्यावर बॅरेकेटिंगची प्लेट कोसळली. त्यामुळे ही महिला खड्ड्यात अडकली आणि गुदमरल्याने तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं.