मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार टँकरच्या खाली घुसली, काळ आता होता पण वेळ नाही
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला असून एका भरधाव सिलिरिओने टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कार मधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
रायगड : मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर एक भीषण अपघात झाला आहे. सिलिरिओ कारने टँकरला पाठिमागून धडक दिली आहे. या भीषण अपघातात कार टँकरच्या खाली घुसली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.
अपघात कसा झाला?
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर पोलीस स्टेशन अंतर्गत माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला असून एका भरधाव सिलिरिओने टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कार मधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नवी मुंबईतल्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आलंय. हे सर्वजण मुंबईतून पुण्याकडे निघाले होते, यावेळी हा अपघात झाला आहे.
दिवसभरात अपघाताच्या मोठ्या घटना
आज सकाळपासून अपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत. नागपुरमध्येही एक भीषण अपघात झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील ईसापुर-घुबडमेट रस्त्यावर आज (रविवारी) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. परिसरातील संत्र्याच्या बगिच्यात संत्री तोडण्यासाठी महिला मजूर एका बोलेरो पिकअप व्हॅनने जात होत्या. पहाटे चार वाजताच्या सुमारास बोलेरो वाहन चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली. त्याच्यामध्ये तिघी जणींचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.