Dombivali Crime : डोंबिवलीतील घरफोडीच्या गुन्ह्यातील तीन चोरट्यांना अटक, व्यवसायातील नुकसान भरून काढण्यासाठी करायचा चोरी
इम्रान खान आणि रियाज खान या दोघा सराईत चोरट्यांना देखील पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरलेला दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हे दोघे एमआयडीसी परिसरात बंद असलेल्या कंपन्यांमधून तांबे पितळ चोरी करत भंगारात विकायचे.
डोंबिवली : घरफोडीच्या गुन्ह्यातील तीन सराईत चोरट्यांना अटक (Arrest) करण्यास मानपाडा पोलिसांना यश आले आहे. अभिजीत रॉय, इम्रान खान आणि रियाज खान अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. अभिजीत रॉय याचा सोने गाळण्याचा व्यवसाय होता. या व्यवसायात त्याला नुकसान (Loss) झालं होतं. हे नुकसान भरून काढण्यासाठी त्याने घरफोडी करत सोने चोरून नुकसान भरून काढण्याच्या मार्ग निवडला. अभिजीत विरोधात याआधी मुंबई, मिरा भाईंदर परिसरात तब्बल 13 गुन्हे दाखल आहेत. डोंबिवलीतील सहा गुन्हे उघड केले आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी 71 तोळे सोने व 25 तोळे चांदी असे 36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत (Seized) करण्यात आला आहे. तसेच इम्रान खान आणि रियाज खान या दोघा सराईत चोरट्यांना देखील पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरलेला दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हे दोघे एमआयडीसी परिसरात बंद असलेल्या कंपन्यांमधून तांबे पितळ चोरी करत भंगारात विकायचे.
सीसीटीव्ही व तांत्रिक तपास करत आरोपींना अटक
मानपाडा पोलिसांच्या हद्दीत दिवसा ढवळ्या घरपोडीचे प्रकार वाढले होते. या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही व तांत्रिक तपास करत आरोपींचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे एका आरोपीला अटक केली. अभिजीत रॉय असं आरोपीचं नाव आहे. मूळचा पश्चिम बंगालच्या असलेल्या अभिजित रॉय हा भायखळा परिसरातील कामाठीपुरा परिसरात राहतो. त्याने सोने गाळण्याच्या व्यवसायात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी चोरीचा घरफोडीचा धंदा निवडला होता. मुंबईवरून डोंबिवली आणि वसई विरारपर्यंत ट्रेनने प्रवास करत तो घराला कुलूप असलेले आणि फोडताना फारसे कष्ट घ्यावे लागणार नाहीत, असे सुरक्षारक्षक नसलेले घर निवडायचा व कडी कोयंडा उचकटून घरफोडी करत असे. त्याच्याकडून मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा गुन्ह्यांची उकल करण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी 71 तोळे सोने व 25 तोळे चांदी असे 36 लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
साहित्याची चोरी करून भंगारात विकून उपजीविका करत होते
आरोपी विरोधात वसई विरार येथे 13 गुन्हे दाखल आहेत 9 महिन्यापूर्वी तो जेलमधून सुटून आला होता. तसे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले इम्रान खान आणि रियाज खान या दोन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला 1 लाख 18 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याच्याकडून मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. हे दोघे एमआयडीसीतील बंद कारखान्यातील छोट्या मोठ्या साहित्याची चोरी करून भंगारात विकून उपजीविका करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मागील काही दिवसात डोंबिवली एसीपी सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, एपीआय अविनाश वणवे, सुनील तारमळे आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेरांच्या मदतीने आरोपीचा माग काढत 10 गुन्हे उघडकीस आणत तीन जणांना अटक केली. आरोपींकडून चोरीचा 40 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने पोलिससाच्या कारवाईचे कौतुक होत आहे. (Three burglars arrested in burglary case in Dombivli)