तीन दिवसांपूर्वी तिघांमध्ये वाद, नंतर भांडण मिटवण्यासाठी पुन्हा भेटले, दोघांनी एकाला संपवलं, शिर्डी हादरलं !
शिर्डीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन आरोपींनी मिळून एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले.
शिर्डी (अहमदमगर) : शिर्डीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन आरोपींनी मिळून एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले. शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृतक तरुण आणि आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
मृतक 24 वर्षीय तरुणाचं अजय जगताप असं नाव आहे. तो पाच वर्षापूर्वी शिर्डीतील भिमनगर भागात राहात होता. हल्ली तो संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे वास्तव्यास होता. तीन दिवसांपूर्वी अजय जगताप याचं शिर्डीतील अक्षय थोरात आणि रोहित खरात यांच्यासोबत भांडण झालं होतं. भांडणाचं प्रकरण मिटवण्यासाठी अजय दोघांना पुन्हा भेटला. पण प्रकरण संपल्यानंतरदेखील आरोपी अक्षय थोरात आणि रोहित खरात या दोघांनी अजयची धारदार शस्त्राने डोक्यावर आणि तोंडावर वार करत हत्या केली. हत्येच्या घटनेनंतर दोघे आरोपी पोलिसांना स्वाधीन झाले आहेत. शिर्डी पोलिसांनी आरोपींविरोधात कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींकडून खुनाची कबुली
आरोपींनी खुनाची कबूली दिल्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले. अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असल्याचे पाटील म्हणाले.
आरोपी कबुली जबाबात नेमकं काय म्हणाले?
अजय जगताप हा शिर्डी येथील आमच्या दुकानावर मांडवली करण्याठी आला होता. बैठकीत वादावर पडदा पडला. त्यावेळी अजय लघूशंकेचा बहाना करुन बाहेर गेला. त्यानंतर काही वेळाने तो पुन्हा आला. त्याच्या कमरेला कोयता होता. झटापटी दरम्यान त्याच हत्याराने अजयचा खून केला, असा कबुली जबाब आरोपींनी दिला आहे.
कल्यामध्ये घरकाम करणाऱ्या महिलेची दगडाने ठेचून हत्या
दुसरीकडे कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणच्या हाय प्रोफाईल गांधारी परिसरात दिवसाढवळ्या एका घरकाम करणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलेच्या पतीने तिची हत्या केल्याचा संशय आहे. सध्या खडकपाडा पोलिस या हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. मयत महिलेचे नाव लक्ष्मी मोहिते आहे. ती त्याच परिसरात घरकाम करते. लक्ष्मी ही भिवंडीतील सावद गाव परिसरात राहत होती. लक्ष्मीची हत्या तिचा पती जर्नादन मोहिते याने केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाईल गांधारी परिसरात रिंग रोड रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. याची माहिती कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना देण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक पवार आणि पीआय शरद जिने हे पोलिस पथकासमोत घटनास्थळी दाखल झाले. जालना जिल्ह्यात राहणारा लक्ष्मीचा पती आणि संशयित जनार्दन मोहिते सध्या बेपत्ता आहे. लक्ष्मीची हत्या दगडाने ठेचून करण्यात आली आहे. महिलेच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जेलमधून सुटलेल्या जावयाकडून सासूची हत्या
दुसरीकडे, तुरुंगातून सुटल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच तरुणाने आपल्या सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील येरवडा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर 42 वर्षीय जावयाने मुंबईत येऊन आपल्या सासूबाईंचा जीव घेतला. बायकोचा ठावठिकाणा सांगण्यास सासूने नकार दिल्याच्या रागातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आरोपी अब्बास शेखला दरोडा टाकल्याच्या प्रकरणात 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. गेल्या आठवड्यात त्याची पुण्याच्या येरवडा तुरुंगातून सुटका झाली. दोन दिवसांनंतर त्याने मुंबई गाठली. पत्नीचा नवा पत्ता जाणून घेण्यासाठी शेख गेल्या आठवड्यात दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास सासूच्या घरी गेला होता.
डोक्यावर फरशीने अनेक वेळा वार
सासूने तुरुंगाबाहेर आलेल्या जावयाला लेकीचा पत्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे घरातच दोघांमध्ये मोठा वादविवाद झाला. त्यानंतर, चिडलेल्या जावयाने घरातच तिच्या डोक्यावर फरशीने अनेक वेळा वार करुन तिची हत्या केल्याचा आरोप आहे. वृद्ध महिला राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्यामुळे मुंबईतील विलेपार्ले भागात गेल्या आठवड्यात एकच खळबळ उडाली होती.
हेही वाचा :
खाणीतल्या तळ्यात चिमुकल्या भावा-बहिणीसह त्यांच्या पित्याचा मृतदेह, नाशिकमध्ये खळबळ, नेमकं काय घडलं?