13 हत्या, 21 चकमकीसह जाळपोळचा गुन्हा, 8 लाखांचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचं पत्नीसह आत्मसमर्पण
8 लाख रुपये बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी आज (30 जुलै) गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
गडचिरोली : गडचिरोली येथून एक चांगली बातमी समोर आली आहे. 8 लाख रुपये बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी आज (30 जुलै) गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. हे दोघेही पती-पत्नी आहेत. या नक्षली दाम्पत्यांमध्ये विनोद ऊर्फ मनिराम नरसु बोगा तसेच त्याची पत्नी कविता ऊर्फ सत्तो हरीसिंग कोवाची या दोघांचा समावेश आहे.
नक्षल दाम्पत्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे
विनोद बोगा हा कोरची दलममध्ये एरिया कमेटी मेम्बर (एसीएम) पदावर दलम डॉक्टर म्हणून कार्यरत होता. त्याची पत्नी कविता कोवाची ही पार्टी मेंबर या पदावर टिपागड दलममध्ये कार्यरत होती. विनोद बोगा याच्यावर खूनाचे 13, चकमकीचे 21, जाळपोळ 1 आणि इतर 5 असे गुन्हे दाखल आहेत. तर पत्नी कविता हिच्यावर चकमकीचे 5, जाळपोळचा 1 आणि इतर 3 असे गुन्हे दाखल आहेत. शासनाने विनोद बोगा याच्यावर 6 लाख रुपयाचे तर कविता कोवाची हिच्यावर 2 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
मार्चमध्ये 22 लाखांचं बक्षीस असलेल्या 4 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण
विशेष म्हणजे याचवर्षी मार्चमध्ये 22 लाखांचं बक्षीस असलेल्या 4 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं होतं. यामध्ये 3 पुरुष आणि 1 महिला नक्षलीचा समावेश आहे. आत्मसमर्पण केलेल्या चारही नक्षलवाद्यांवर खून, जाळपोळ, चकमकी असे विविध गुन्हे दाखल होते, अशी माहिती गडचिरोलीच्या जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळुन वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवुन आणल्यामुळे माओवादी मोठया संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन 2020-21 या वर्षांत आजपर्यंत 37 माओवादयांनी आत्मसमर्पण केले आहे. यात 4 डिव्हीसी, 2 दलम कमांडर, 2 दलम उपकमांडर, 28 सदस्य, 1 जनमिलीशिया यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी दिली.