पत्नीने दरवाजा न उघडल्याचा राग, नाराज नवऱ्याने ओढणीने गळा आवळून जीव घेतला
गच्चीतून उडी मारुन घरात गेल्यावर पतीला पत्नी खोलीत झोपलेली दिसली. हे पाहून त्याचा संताप झाला. त्याने बायकोला उठवलं आणि दरवाजा न उघडल्याचा जाब विचारला. तेव्हा तिने चिडून शिवीगाळ केल्याच्या रागातून आपण तिची हत्या केली, असा दावा आरोपी पतीने केला आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये हत्येचं चक्रावणारं प्रकरण समोर आलं आहे. तीन दिवसांपूर्वी एका विवाहितेचा मृतदेह तिच्या राहत्या घरी सापडला होता. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलीसही बुचकळ्यात पडले होते. मात्र महिलेच्या माहेरच्या माणसांनी तिच्या पतीविरोधात तक्रार दिली आणि तपासादरम्यान हत्या प्रकरणाचा उलगडा झाला. पत्नीने दरवाजा न उघडल्याच्या रागातून नवऱ्यानेच ओढणीने गळा आवळून जीव घेतल्याचं उघड झालं आहे.
काय आहे प्रकरण?
ग्रेटर नोएडातील कासना भागात 23 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. मीना शर्मा नावाची महिला घरातील खोलीत मृतावस्थेत सापडली होती. तिच्या माहेरच्यांनी पती आणि सासरच्या मंडळींवर संशय व्यक्त करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास केल्यावर मीनाचा पती दीपकनेच ही हत्या केल्याचं उघड झालं. पोलिसांनी त्याला सुरजपूर भागातून अटक केली. हत्येसाठी वापरलेली ओढणीही पोलिसांनी जप्त केली आहे.
नेमकं काय घडलं?
रक्षाबंधनाच्या दिवशी आरोपी दीपक शर्मा ग्राम गेझा भागात राहणाऱ्या आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. त्या दिवशी तो तिथेच थांबला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आपल्या घरी आला, तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. बायकोला आवाज देऊनही दरवाजा उघडला गेला नाही.
भावाच्या घरातून उडी मारुन गच्चीत
दीपक शेजारीच राहणाऱ्या आपल्या भावाच्या घरी गेला, तेव्हा भावाचं कुटुंबही कुठेतरी बाहेर गेल्याचं त्याला समजलं. त्यामुळे भावाच्या घराबाहेर असलेली शिडी चढून तो त्याच्या घराच्या छतावर गेला. तिथल्या भिंतीवरुन उडी मारुन तो आपल्या घराच्या गच्चीत पोहोचला. तिथून जिना उतरुन घरात गेल्यावर त्याला बायको खोलीत झोपलेली दिसली. हे पाहून त्याचा संताप झाला. दीपकने मीनाला उठवलं आणि दरवाजा न उघडल्याचा जाब विचारला. तेव्हा तिने चिडून आपल्याला शिवीगाळ केली, असा दावा दीपकने केला आहे. याच रागातून आपण पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची कबुलीही दीपकने दिली.
पुन्हा बहिणीच्या घरी
इतक्यावर न थांबता दीपकने मीनाच्या गळ्यातील ओढणीने पुन्हा तिचा गळा आवळला. ओढणी फेकून देऊन तिचा मृतदेह त्याने टेबलवर ठेवला. त्यानंतर पुन्हा तो गच्चीत गेला आणि आल्या पावली तो भावाच्या घरामार्गे बाहेर पडला. त्यानंतर त्याने थेट गावाबाहेरचा रस्ता धरला. तिथून तो पुन्हा बहिणीच्या घरी आला आणि काही घडलंच नसल्याचा आव आणला. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन हत्येचा छडा लावला.
संबंधित बातम्या :
दारुच्या गुत्त्यावर किरकोळ वाद, नागपुरात तिघा मित्रांकडून तरुणाची हत्या
पत्नीच्या चारित्र्यावर संशय, मुंबईत पतीने 12 वर्षांच्या मुलीला चाकूने भोसकले