पोलीस प्रेयसीचा लग्नासाठी तगादा, नवऱ्याने बायको-मुलांना मारुन जमिनीत पुरलं, साडेतीन वर्षांनी पर्दाफाश
अनेक वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर रुबीने राकेशवर लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. अखेर राकेशने 14 फेब्रुवारी 2018 रोजी पत्नी रत्नेश आणि दोन्ही मुलांची (3 वर्षांचा अर्पित आणि 2 वर्षांची अवनी) हत्या केली आणि त्यांचे मृतदेह आपल्या घराच्या तळघरात पुरले.
लखनौ : महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या प्रेमात वेड्या झालेल्या पुरुषाने आपली पत्नी आणि दोन निष्पाप मुलांची हत्या केली. त्यानंतर तिघांचे मृतदेह तळघरात पुरले. इतक्यावरच न थांबता आपल्या मित्राची हत्या करत त्याने आपला मृत्यू झाल्याचं सोंग रचलं आणि खरी ओळख लपवून प्रेयसीसोबत राहू लागला. परंतु पोलिसांनी मित्राच्या हत्येचा तपास करताना संशयाच्या आधारावर त्याला अटक केली. त्यावेळी त्याने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याची कबुली दिली. जवळपास साडेतीन वर्षांनंतर या तीन हत्यांचा खुलासा झाला. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये ही चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे.
काय आहे प्रकरण?
ही घटना ग्रेटर नोएडामधील गौतम बुद्ध नगरच्या बिसरख पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिपियाना बुर्ज गावाच्या पंच बिहार कॉलनीतील आहे. मात्र उत्तर प्रदेशातील कासगंज पोलिसांकडून तळघराच्या उत्खननाचे काम सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती राकेश संबंधित घरात राहत होता. 2012 मध्ये एटा येथे राहणाऱ्या रत्नेश नावाच्या महिलेशी त्याचं लग्न झालं होतं, पण गावातच राहणाऱ्या रुबीसोबत राकेशचं प्रेम प्रकरण सुरु होतं. रुबी 2015 मध्ये पोलिस हवालदार म्हणून तैनात झाली होती.
प्रेयसीचा लग्नासाठी दबाव
अनेक वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर रुबीने राकेशवर लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. अखेर राकेशने 14 फेब्रुवारी 2018 रोजी पत्नी रत्नेश आणि दोन्ही मुलांची (3 वर्षांचा अर्पित आणि 2 वर्षांची अवनी) हत्या केली आणि त्यांचे मृतदेह आपल्या घराच्या तळघरात पुरले. एवढेच नाही तर कोणालाही कळू नये, म्हणून त्यावर सिमेंटचा एक मजला बनवण्यात आला. राकेशचे वडील बनवारीलाल, आई इंदुमती, भाऊ राजीव आणि प्रवेशही या गुन्ह्यात सहभागी होते. राकेशचे वडीलही पोलिसातून निवृत्त झाले आहेत.
मित्राची हत्या, स्वतः मेल्याचं सोंग
या हत्यांनंतर राकेश आपली प्रेयसी रुबीसोबत खरी ओळख लपवून राहत होता. मात्र खरी ओळख उघड होण्याची भीती त्याला सतत सतावत होती. म्हणून त्याने आणखी एक खून करण्याची योजना आखली. तीन वर्षांनंतर, म्हणजे 25 एप्रिल 2021 रोजी राकेशने आपल्या मित्राची हत्या केली. त्याची ओळख पटू नये म्हणून त्याचा मृतदेह अत्यंत क्रूरपणे चिरडण्यात आला होता.
यानंतर, त्याने आपले आधार कार्ड आणि एलआयसी पेपर मृतदेहाजवळ ठेवले ,जेणेकरून पोलिसांना वाटेल की राकेशचीच हत्या झाली आहे. कासगंजच्या ढोलना पोलिसांनी जेव्हा हत्येचा तपास सुरू केला, तेव्हा संशयाची सुई राकेशपर्यंत पोहोचली. पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याची कसून चौकशी केली, तेव्हा त्याने पत्नी आणि दोन्ही मुलांच्या हत्येचे रहस्य उलगडले आणि मित्राच्या हत्येचीही कबुली दिली. आता कासगंज पोलिसांना त्याच्या दाव्यांची पुष्टी करण्यासाठी तळघराचे उत्खनन करायचे आहे आणि पुरावेही मिळवायचे आहेत.
संबंधित बातम्या :
8 नवऱ्यांसोबत सप्तपदी, नवव्या लग्नासाठी सावजाचा शोध, ‘दरोडेखोर’ वधू निघाली एड्सग्रस्त
लेकीच्या कपाळी प्रियकराच्या नावाचं सिंदूर, भडकलेल्या आईने पोटच्या मुलीचा गळा दाबला
जात पंचायतीकडून घटस्फोट का घेतला नाही? वाळीत टाकल्याने पुण्यात तरुणाची पोलिसात धाव