तीन महिन्यांआधी कट शिजला, तब्बल 5 लाखांची सुपारी, 2 लाख अॅडव्हान्स, गोंदियातील ‘त्या’ हत्येचं गूढ उकललं
गोंदिया शहराच्या गणेशनगर भागात राहणाऱ्या 45 वर्षीय व्यवसायिक अशोक कौशिक यांची 21 आगस्टला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.
गोंदिया : गोंदिया शहराच्या गणेशनगर भागात राहणाऱ्या 45 वर्षीय व्यवसायिक अशोक कौशिक यांची 21 आगस्टला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपींनी पाच लाख रुपयाची सुपारी घेऊन अशोक कौशिक यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. हत्येच्या घटनेमागील मुख्य सूत्रधाराचं काही दिवसांपूर्वी कौशिक यांच्यासोबत भांडण झालं होतं. या मुख्य आरोपीची शहरात जीम आहे. कौशिक त्याच्या जीमच्या बाजूलाच नवी जीम सुरु करणार होते. याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर पुढे आरोपीने कौशिक यांच्या हत्येसाठी 5 लाखांची सुपारी दिली.
नेमकं प्रकरण काय?
मृतक अशोक कौशिक हे आरोपी चिंटू शर्मा यांच्या जीमजवळ नवीन अत्याधुनिक जीम उघडणार होते. आरोपीला आपल्या जीमचा व्यवसाय ठप्प पडेल या भीतीने त्याने तीन महिन्यांपूर्वीच त्याचा सहकारी दीपक भुते याच्यामार्फत अशोक कौशिक यांच्या हत्येची सुपारी दिली होती. चिंटू शर्माने कौशिक यांच्या हत्येसाठी आरोपी सतीश बनकरला 5 लाखांची सुपारी दिली होती. त्यापैकी 2 लाख रुपये आधीच अॅडव्हान्स म्हणून दिले होते.
पोलिसांकडून आरोपींना सहा तासात बेड्या
आरोपी सतीश बनकरने अशोक कौशिक यांच्यावर पाळत ठेवली. अशोक हे 21 ऑगस्टला सकाळी आठ वाजता घराबाहेर पडले. ते दुचाकीने जात होते. यावेळी आरोपी जाणीवपूर्वक त्यांच्याजवळ गेला. त्याने पेट्रोल घ्यायला जात असल्याचं सांगून लिफ्ट मागितली. अशोक यांनी सतीशला लिप्ट दिली. यावेळी आरोपीने गाडीवर बसताच अशोक यांच्या मानेवर बंदुकीने गोळ्या झाडत त्यांची हत्या केली. त्यानंतर आरोपीने घटनास्थळी बंदूक फेकत पढ काढला. पोलिसांनी आपले तपासचक्रे फिरवीत हत्येच्या सहा तासात तीनही आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी तीन आरोपींना कसं पकडलं?
पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कारवाई केली. शनिवारी सकाळी घटनास्थळी कौशिक यांचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. कौशिक यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांना तपास करत असताना ज्या बंदुकीने कौशिक यांची हत्या झाली तीच बंदूक त्याच परिसरात सापडली. कदाचित तोच एक मोठा पुरावा होता. पोलिसांनी तपासाचे सूत्र फिरवित तीन आरोपींना अखेर बेड्या ठोकल्या. सतिश बनकर, चिंटू शर्मा आणि दीपक भूते असे आरोपींचे नावे आहेत.
हेही वाचा :
सरकारी शाळा बनली डान्स बार, ज्ञान मंदिरात छमछम, लाजिरवाणी घटना
बॉयफ्रेण्डने दुसऱ्याच मुलीसोबत लग्नगाठ बांधल्याचा राग, पुण्यात 22 वर्षीय तरुणीचा गळफास