Jaipur Murder : धक्कादायक ! मोबाईल चार्जरने नवऱ्याचा गळा घोटला; मृतदेह कबरीतून बाहेर काढल्यानंतर सत्य उजेडात
मृतदेहाच्या पोस्टमार्टममध्ये हत्येची पुष्टी झाली आणि पोलिसांनी 12 जुलै रोजी मदीनाला अटक केली. मदीना हिचे परिसरातील एका ग्रामीण डॉक्टरसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोपही तिच्या सासूने केला होता.
जयपूर : पती-पत्नीच्या नात्यात संशय शिरला कि तो संसार उद्ध्वस्त होतोच. त्याचबरोबर दोघे एकमेकांच्या जीवावरही उठू शकतात. अशाच संशयातून पत्नीने पती (Husband)चा खून (Murder) केला. विशेष म्हणजे तिने मोबाईल चार्जर (Mobile Charger)ने पतीचा गळा आवळला आणि त्याला जीवे ठार मारले. राजस्थानमधील फतेहपूर शेखावती येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पतीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढल्यानंतर हे धक्कादायक सत्य उजेडात आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुरुवातीला या पुरुषाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवून त्याचा दफनविधी करण्यात आला होता. पण महिलेवर तिच्या सासूने संशय घेतला. त्यानंतर तिनेच हत्या केल्याची बाब उघडकीस आली. हत्येनंतर आठ दिवसांनी पोलिसांनी मृतदेह कबरीतून बाहेर काढून तपास केला. या तपासातून महिलेचे पितळ उघड होताच तिने चौकशीत पतीच्या हत्येबाबत कबुली दिली.
हत्या झालेला इसम हा पत्नीसमोर दुसऱ्या महिलेशी गप्पा मारायचा!
फतेहपूर शेखावटी येथील रहिवासी असलेल्या मकसूदचा सुमारे सहा वर्षांपूर्वी आरोपी मदिनासोबत विवाह झाला होता. तो मकसूद गावातच दागिने बनवण्याचे काम करायचे. त्याचे दुसऱ्या महिलेशी संबंध होते. तो पत्नीसमोरच त्या महिलेशी अश्लील गप्पा मारायचा. मदीनाला पतीच्या या कृत्यांचा खूप राग आला होता. त्याच रागातून ती अनेक दिवसांपासून पतीला मारण्याची योजना आखत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जुलै रोजी आरोपी मदिना ही पती मकसूद आणि सासूसोबत गावापासून काही अंतरावर एका लग्नाला गेली होती.
मकसूद दुपारी दोनच्या सुमारास लग्न आटोपून घरी परतला. त्यानंतर सुमारे एक तासाने म्हणजे दुपारी 3 वाजता मदिना घरी परतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी घरात फक्त मदिना आणि तिचा पती मकसूद हे दोघेच होते. मकसूदला घरात झोपलेले पाहून मदीनाने आधी साडीने त्याचा गळा दाबला. नंतर मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला. नंतर पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे मदिनाने भासवले. मकसूदचा लहान भाऊ मुस्तफा दुपारी चार वाजता घरी परतला तेव्हा मदीनाने त्याला मकसूदने आत्महत्या केल्याचे सांगितले. मकसूद तिला मारहाण करायचा, असे तिने पोलिसांना सांगितले.
पुरावा नष्ट करण्यासाठी दफनविधी उरकला होता!
‘आज तक’च्या वृत्तानुसार, पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी कुटुंबीयांनी मकसूदला कब्रस्तानात पुरले होते. काही दिवसांनंतर मदिनावर तिच्या सासूने संशय घेतला. त्याआधारे पोलिसांनी मदीनाची चौकशी केली. त्यात तिने घाबरून पतीच्या हत्येचा कट रचल्याचे मान्य केले. कुटुंबीयांनी 9 जुलै रोजी पोलिसांना खबर दिली होती. त्यानंतर मकसूदचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला होता. मृतदेहाच्या पोस्टमार्टममध्ये हत्येची पुष्टी झाली आणि पोलिसांनी 12 जुलै रोजी मदीनाला अटक केली. मदीना हिचे परिसरातील एका ग्रामीण डॉक्टरसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोपही तिच्या सासूने केला होता. मकसूदच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, मदीना आणि डॉक्टर यांनी मिळून मुलाची हत्या केली. तपासाअंती पोलिसांनी या घटनेत डॉक्टरचा सहभाग असल्याचे नाकारले आहे. (Wife kills husband by strangulation with mobile charger in Jaipur)