रात्री लिपस्टिक लावली, सकाळी गायब, अखेर लिपस्टिक गेली कुठे? गोष्ट छोटी, पण…; नवरा-बायकोचं प्रकरण थेट…
कुणाच्या नात्यात कशावरून मतभेद निर्माण होतील हे सांगता येत नाही. नातं हे काचेच्या भांड्यासारखं असतं, अविश्वासाचा खडा पडताच त्याला तडे जातात. आता एका नवऱ्याने पत्नीवर संशय घेतला. कारण तसं क्षुल्लक होतं. काय झालं त्या दोघांचं पुढे?
आग्रा | 15 सप्टेंबर 2023 : पती-पत्नीच्या नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. विश्वासावरच हे नातं टिकून असतं. त्यामुळेच या नात्याला अर्थ प्राप्त होतो. थोडा जरी एकमेकांवरील विश्वास ढळला तर आयुष्याची वाट लागू शकते. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे असाच एक प्रकार घडला आहे. अत्यंत धक्कादायक प्रकरण घडलं आहे. पती आणि पत्नीचा एकमेकांवरील विश्वास उडाला. नात्यात मतभेद निर्माण झाले अन् आता प्रकरण थेट नातं तुटण्यावर आलं आहे. या दोघांमध्ये असं काय झालं की जेणे करून त्यांच्या नात्यातच अविश्वास निर्माण व्हावा?
आग्रा येथील शहीद नगरमध्ये हा प्रकार घडला आहे. येथील एक व्यक्ती सिकंदरा परिसरात बुटांच्या फॅक्ट्रीत काम करतो. तीन महिन्यापूर्वीच त्याचं लग्न झालं आहे. लग्नानंतर दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत सुरू होतं. त्यानंतर असं काही झालं की दोघांमध्ये खटके उडायला लागले. वाद वाढत गेले. त्याला एक क्षुल्लक गोष्ट कारणीभूत ठरली.
समोरच लिपस्टिक लावली, मग गेली कुठे?
नवऱ्याच्या म्हणण्यानुसार नेहमी प्रमाणे तो एक दिवशी फॅक्ट्रीत कामाला आला. रात्री झोपण्यापूर्वी त्याच्या बायकोने त्याच्या समोर ओठांना लिपस्टिक लावलेली होती. पण सकाळी पाहिलं तर पत्नीच्या ओठावरची लिपस्टिक गायब होती. त्याने याबाबत पत्नीला जाब विचारला. तर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याचा संतापाचा पार चढला. आणि पत्नीवरचा संशयही वाढला.
ब्रश केला, तोंड धुतलं, नाश्ता आणि…
पत्नीच्या म्हणण्यानुसार रात्री लिपस्टिक लावली होती. पण सकाळी ब्रश केल्यावर तोंड धुतलं. त्यानंतर नाश्ता केला. त्यामुळे लिपस्टिक निघून गेली. नवरा नेहमीच संशय घेतो. लिपस्टिक गायब झाल्यामुळे त्याने मारहाणही केली. त्यामुळे तिने थेट पोलिसात धाव घेऊन पोलिसांना सर्व प्रकार सांगितला.
समुपदेशन सुरू
त्यानंतर पोलिसांनी या दोघांना समुपदेशन केंद्रात पाठवलं. या ठिकाणी समुपदेशन केंद्राचे अधिकारी दोघांचं समुपदेशन करत आहेत. लिपस्टिकवरून दोघा नवरा बायकोंमध्ये वाद निर्माण झाला आहे. नवरा पत्नीवर संशय घेतोय. आता या दोघांचं समुपदेशन केलं आहे. त्यांना पुढची तारीख दिली आहे. असं समुपदेशन केंद्राचे प्रभारी अतुल चौधरी यांनी सांगितलं.