पैसे दिले नाहीत म्हणून राग, आईची धारदार शस्त्राने हत्या, सोलापुरातील धक्कादायक घटना
सोलापूर शहरातील मित्र नगर शेळगी येथील सुनील नगरमध्ये मुलाने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी अतुल एकनाथ कोळेकर याला ताब्यात घेतले आहे.
सोलापूर : शहरातील मित्र नगर शेळगी येथील सुनील नगरमध्ये मुलाने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी अतुल एकनाथ कोळेकर याला ताब्यात घेतले आहे. अतुलला दारुचे व्यसन होते. काही दिवसांपूर्वी अतुलने आपली आई वंदना एकनाथ कोळेकर यांच्याकडे पैशाची मागणी केले होती. आईने पैसे न दिल्याच्या रागातून अतुल याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मध्यरात्री दीड वाजता आईची हत्या
ही घटना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आईच्या डोक्यात कुकरी सारख्या धारदार शस्त्राने हल्ला करून ठार मारण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी अतुल याने आई वंदनाकडे पैसे मागितले होते ते तिने दिले नसल्याचा राग आरोपीच्या मनात होता. यातून त्याने खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी अतुल एकनाथ कोळेकर याला ताब्यात घेतले आहे. खुणाबाबत आणखी अन्य कोणते कारण आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
बीडमध्ये देखील मद्यपी तरुणाकडून आईची हत्या
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये देखील अशीच घटना समोर आली होती. बीडच्या चौसाळा गावात ही घटना घडली होती. हे गाव नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत येतं. आरोपी मुलाचं नाव पांडुरंग मानगिरे असं आहे. तो शुक्रवारी (20 ऑगस्ट) रात्री उशिरा घरी आला. त्याने घरी आल्यानंतर त्याची आई प्रयोगाबाई मानगिरे यांच्यासोबत वाद घातला. यावेळी त्याने आईला अमानुष मारहाण केली. या मारहाणीत आईचा दुर्देवी मृत्यू झाला. काही तासांनी पहाटेच्या सुमारास आईचं निधन झाल्याचं नराधमाला समजलं. त्यानंतर तो घरातून पळून गेला.
आरोपीला बेड्या
या दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर आरोपी मुलाची शोध मोहिम सुरु केली. अखेर नेकनूर पोलिसांनी जालना जिल्ह्याच्या सीमेवर आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.
हेही वाचा :