11th Admission: शिक्षण विभागाच्या दोन परस्पर विरोधी भूमिका, विद्यार्थ्यांचा गोंधळ, पालकांचा संताप! अकरावी प्रवेशाचा नेमका विषय काय?
सर्व विद्यार्थ्यांना सामान न्याय मिळावा म्हणून बाकी बोर्डांचा दहावीचा निकाल लागल्यावरच प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरु करण्यात येईल असा शासनाने निर्णय घेतला. पण आता हा नियम फक्तच महापालिकेच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लागू होतोय.
मुंबई: यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी (11th Admission) शिक्षण विभागाने (Education Department) ऑनलाइन प्रवेशाचे मॉक अर्ज उपलब्ध करून दिले होते. या मॉक अर्जाचे दोन भाग होते. एक भाग विद्यार्थी आधीच भरू शकत होते आणि विद्यार्थ्यांनी भरले सुद्धा. दुसरा भाग जो विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल लागल्यावरच भरता येणार होता. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल वेळीच लागलेला आहे पण सीबीएसई आणि आयसीएसईचा दहावीचा निकाल (CBSE-ICSE 10th Results) अजूनही बाकी आहे. सर्व विद्यार्थ्यांना सामान न्याय मिळावा म्हणून बाकी बोर्डांचा दहावीचा निकाल लागल्यावरच प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरु करण्यात येईल असा शासनाने निर्णय घेतला. पण आता हा नियम फक्तच महापालिकेच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लागू होतोय. कारण बाकी ठिकाणी तर अकरावीची ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. शिक्षण विभागाच्या या दोन परस्पर विरोधी भूमिकांमुळे पुणे पालकांमध्ये संतापाची लाट पसरलीये.
प्रमुख शहरात राहणा-या विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेश लांबला
कालपासून अकरावी ऑफलाईन प्रवेशासाठीचे अर्ज विक्री सुरू झाली आहे. 21 जुलैला सर्वसाधारण गुणवत्ता यादी, 22 जुलै पहिली गुणवत्ता यादी, 28 ऑगस्ट दुसरी तर 3 ऑगस्टला तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. हे ऑफलाईन प्रवेश देताना सीबीएसई, आयसीएसईसह इतर केंद्रीय बोडींचे दहावीचे निकाल अद्याप बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशासाठी जाहीर न झाल्याने या नोंदणी केलेले विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के जागा राखीव ठेऊन एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अकरावीत ऑफलाईन प्रवेश घेणाऱ्या एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून मुंबई, पुणे, नागपूरसारख्या प्रमुख शहरात राहणा-या दहावीच्या विद्यार्थ्यांचा मात्र अकरावी प्रवेशाचा प्रवास लांबला आहे.
अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेले विद्यार्थी
- मुंबई – 2,77,879
- पुणे – 90,852
- नागपूर – 31,714
- नाशिक- 25,083
- अमरावती – 10,521
शिक्षण विभागाच्या दोन परस्पर विरोधी भूमिकांमुळे गोंधळ!
मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक आणि अमरावती महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेश हे ऑनलाईन होत आहेत. हे विभाग वगळता राज्यात इतर ठिकाणी अकरावीची ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. काही बोर्डांचा दहावीचा निकाल न लागल्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रवेशात 10 टक्के जागा राखीव ठेवून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहेत. तर दुसरीकडे अकरावीच्याच ऑनलाईन प्रवेशासाठी शिक्षण विभाग केंद्रीय बोडींच्या निकालाची प्रतीक्षा करीत असून सीबीएसईचा निकाल जाहीर झाल्यानंतरच ऑनलाईन प्रवेशाच्या गुणवत्ता याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. शिक्षण विभागाच्या या दोन परस्पर विरोधी भूमिकांमुळे चांगलाच गोंधळ उडालेला आहे.