अजित पवार निवडणुकीच्या निकालाने निराश? NDA च्या बैठकीआधी घेतला महत्त्वाचा निर्णय
राज्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटल्यानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक होती. ज्यामध्ये महायुतीला अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा मिळाल्या आहेत. या निकालावर अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेने एकत्र निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या पक्षाची कामगिरी सर्वात निराशाजनक राहिली. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने चार जागा लढवल्या होत्या पण त्यांना फक्त एकाच जागेवर विजय मिळवता आला. आता निकालानंतर दिल्लीत एनडीएची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे. या बैठकीला एनडीएमधील सर्व पक्षाच्या प्रमुखांना बोलवण्यात आसे आहे. पण या बैठकीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त आहे. अजित पवार निकालावर नाराज असण्याची चर्चा आहे. त्यामुळे ते दिल्लीला जाणार नाहीत.
एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे या एनडीएच्या बैठकीला उपस्थित आहेत. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून दणदणीत विजयी मिळवला आहे. लोकसभा निकालानंतर एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने आज दिल्लीत एनडीएची बैठक बोलावली आहे. भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने मित्रपक्षांच्या पाठिंब्याने त्यांना सरकार स्थापन करावे लागणार आहे. भाजपने २४० जागा जिंकल्या आहेत. तर एनडीएला एकूण २९३ जागा मिळाल्या आहेत.
महायुतीला मोठा धक्का
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात फूट पडल्यानंतर महाराष्ट्रातील ही पहिलीच मोठी निवडणूक होती. भाजप, शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीला ज्यात मोठा धक्का बसला. महायुतीने 45+ चा नारा दिला होता. मात्र, त्यांना महाराष्ट्रात निम्म्या जागाही मिळवता आल्या नाहीत. महाराष्ट्रात भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला एकूण १७ जागा मिळाल्या आहेत.
एनडीएची महत्त्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सोपवला आहे. आता नवीन सरकार स्थापन होई पर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करणार आहेत. आज एनडीएच्या बैठकीत मंत्रिमंडळाबाबत चर्चा होऊ शकते. कोणत्या पक्षाला किती मंत्रीपद मिळतील यबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. भाजपला बहुमत न मिळाल्याने सर्वच मित्रपक्षांची मागणी वाढली आहे. कॅबिनेट मंत्रीपदाचे वाटप आणि शपथविधी या दोन मुद्द्यावर बैठकीत चर्चा होणार आहे.