Anurag Thakur
अनुराग ठाकूर हे हिमाचल प्रदेशासह देशाच्या राजकारणातील एक प्रमुख चेहरा आहेत. राष्ट्रीय राजकारणातही त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1974 मध्ये हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथे झाला. ते हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रेमकुमार धुमल यांचे सुपुत्र आहेत तसेच हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदारही आहे. केंद्र सरकारमध्ये त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्री तसेच क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ठाकूर यांना क्रिकेटमध्ये खूप रस आहे. ते अखिल भारतीय उत्तर विभागाच्या अंडर 19 संघाचे कर्णधारही राहिले आहेत. त्याचबरोबर ते हिमाचल प्रदेशकडून जम्मू-काश्मीरविरुद्ध रणजी सामनेही खेळले आहेत. ते टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट देखील आहेत. 2016 मध्ये, अनुराग ठाकूर यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांची राजकीय कारकीर्द 2008 मध्ये सुरू झाली. ते आतापर्यंत चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते बीजेवायएमचे अध्यक्षही राहिले आहेत