आधी भाजपला सत्तेत आणलं, आता काँग्रेसला, कोण आहेत सुनील कानुगोलू?; काय होती विजयाची रणनीती?
कर्नाटकात काँग्रेसला मोठा विजय मिळाला आहे. त्यामागे नेते आणि कार्यकर्त्यांची मेहनत आहेच. पण सुनील कानुगोलू यांचाही या विजयात सिंहाचा वाटा आहे. सुनील हे काँग्रेस नेते नाहीत. तर ते रणनीतीकार आहेत. त्यांनी काँग्रेससाठी रणनीती तयार केली होती.
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. या निवडणुकीत केवळ काँग्रेसला मोठा विजय मिळाला नाही तर भाजपला चांगलाच कात्रजचा घाट दाखवला आहे. त्यामुळे भाजपला दक्षिण भारतातील शेवटचं राज्यही बंद झालं आहे. काँग्रेसच्या या विजयात अनेक नेत्यांचा हात आहे. त्यांची मेहनत आहे. पण या विजयामागे आणखी एक चेहरा आहे. तो म्हणजे सुनील कानुगोलू. सुनील कानुगोलू हे काँग्रेसचे रणनतीकार आहेत. त्यांनी कर्नाटकातील काँग्रेसची रणनीती ठरवली होती. काँग्रेसच्या विजयाची पटकथा लिहिली होती. त्यामुळेच आज सर्वांसमोर पिक्चर आहे.
सुनील कानूगोलू यांनी काँग्रेसच्या विजयाची रणनीती बनवली. त्यांनी सर्वात आधी कर्नाटकातील जनतेशी व्यापक संपर्क साधण्याचा काँग्रेस नेत्यांना सल्ला दिला. तशी रणनीती तयार केली. तसेच भाजपमधील अंतर्गत वाद, कुशासन आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांना सुनील यांनी अधिक हायलाईट केले. त्यामुळे भाजप एक्सपोज झाली आणि काँग्रेसला प्रचंड यश मिळालं. सुनील यांनी निवडणूक प्रचाराचे नवनवे तंत्र हाताळले. लोकांचा कल जाणून घेण्यासाठी त्यांनी वेगवेगळे सर्व्हे केले. त्यामुळे काँग्रेसचा विजय सोपा झाला.
मार्चमध्ये काँग्रेससोबत
सुनील कानूगोलू यांनी गेल्यावर्षी मार्चमध्ये काँग्रेससोबत काम करण्यास सुरुवात केली. काँग्रेसचे रणनीतीकार म्हणून त्यांनी काम पाहिलं. काँग्रेसने गेल्यावर्षी मे महिन्यात 2024 साठी एक टास्क फोर्स स्तापन केली आहे. त्यात सुनील यांना सदस्य म्हणून घेतलं आहे. सुनील यांनी यापूर्वी डीएमके, एआयडीएमके आणि भाजपसोबतही काम केलं आहे. त्यांनी 2017च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपसाठी, 2019मध्ये डीएमकेसाठी, 2021मध्ये तामिळनाडू विधानसभेत एआयडीएमकेसाठी निवडणूक रणनीती तयार करून दिली होती. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूनंतर एआयएडीएमकेसाठी सुनील यांनी रणनीती तयार केली. त्यामुळे पक्षाने जोरदार मुसंडी मारली होती.
प्रशांत किशोर यांच्यासोबत काम
2014पूर्वी सुनील यांनी प्रशांत किशोर यांच्यासोबत काम केलं आहे. सुनील हे मॅकिन्सेचे माजी सल्लागार होते. 2014मध्ये नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचारातील ते एक महत्त्वाचा घटक होते. त्यांनी भाजपमध्ये असोसिएनशन ऑफ बिलियन माइंड्सचे (एबीएम) प्रमुख म्हणून काम केलं होतं. त्यांनी एबीएमचे प्रमुख म्हणून काम करताना भाजपासाठी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. या सर्व निवडणुकीत भाजप विजयी झाली होती. तसेच सर्वात मोठा पक्ष म्हणूनही भाजप उदयास आला होता.
भारतजोडोचे रणनीतीकार
सुनील मूळचे कर्नाटकाचे आहेत. त्यांचं बालपण चेन्नईत गेलं. त्यांची प्रोफाईल अत्यंत साधी आहे. मात्र, तरीही राजकीय क्षेत्रात त्यांना मोठी पसंती आहे. गेल्या वर्षी ते काँग्रेससोबत काम करू लागले. त्यांनी देशातील सर्वात जुन्या पक्षासाठी रणनीती बनविण्यास सुरुवात केली. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु केली. त्याचं श्रेयही सुनील यांनाच जातं. त्यामागची रणनीती सुनील यांचीच होती. विशेष म्हणजे कर्नाटकातील 2018च्या विधानसभा निवडणुकीत सुनील यांनी भाजपसोबत काम केलं होतं. त्यावेळी भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता.
भविष्यातील प्रकल्प
भविष्यात त्यांना तेलंगनात काँग्रेसला सत्ता आणून द्यायची आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता राखायची आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसला विजय मिळवून द्यायचा आहे. सध्या तरी सुनील यांच्या हातात हे प्रकल्प असून त्यासाठी त्यांनी जोरात कामही सुरू केलं आहे.