‘नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी; मी शरद पवारांना विचारु इच्छितो…’, अमित शाह यांचा नांदेडमध्ये घणाघात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामटेकच्या सभेत ठाकरे गटावर निशणा साधताना नकली शिवसेना अशी टीका केली होती. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला नकली शिवसेना म्हटलं आहे. तसेच त्यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.
भाजपचे नांदेडचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा पार पडली. या सभेत अमित शाह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. “महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र झाले आहेत. एक नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि एक आर्धी उरलेली काँग्रेस. आमच्या गुजरातमध्ये एक म्हण आहे, तीन तिघाडा, काम बिघाडा. मी आपल्याला सांगायला आलोय की, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आर्धी राहिलीय. शरद पवार यांची राष्ट्रवादी आर्धी राहिलीय, हे अर्धे होतेच, पण या दोघांनी मिळून काँग्रेसला आर्ध करण्याचं काम केलं. हे तीन आर्धे मिळून महाराष्ट्राचं भलं करतील का? ही एक अशी ऑटो रिक्षा आहे, जिचे तीन पाय आहेत, पण गवर्नर अम्बेसिडरचं आहे, गिअरबॉक्स फियाटचं आहे, आणि उर्वरित इंजिन मर्सडीजचं आहे. या ऑटो रिक्षाला कोणतीच दिशा नाही. या रिक्षाचं भविष्य स्पष्ट आहे. निवडणुकीनंतर आपापसातील मतभेदामुळे हे लोक तुटणार आहेत”, अशी टीका अमित शाह यांनी केली.
“मी नांदेडच्या नागरिकांना विचारु इच्छितो, काश्मीर आपलं आहे की नाही? काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणतात की, काश्मीरचा महाराष्ट्र आणि राजस्थानची काय संबंध? नांदेडचा बच्चा-बच्चा काश्मीरच्या लढाईसाठी तयार आहे. कलम 370 हटायला हवी होती की नाही? काँग्रेस पक्ष 70 वर्षांपासून कलम 370 एका लहान बाळासारखं सांभाळून ठेवलं होतं. मोदींनी 5 ऑगस्ट 2019 ला कलम 370 हटवून काश्मीरला भारताशी कायमचं जोडण्याचं काम केलं आहे”, असा दावा अमित शाह यांनी केला.
“सोनिया, मनमोहन यांचं सरकार चाललं तेव्हा बॉम्बस्फोट व्हायचे. दहशतवादी भारतात दहशतवादी कारवाया करुन पळून जायचे. तुम्ही 2014 ला मोदींना पंतप्रधान बनवलं. मोदींनी काश्मीरला वेगळ्या दृष्टीकोनाने पाहिलं. त्यांच्या काळातही पुलवामा आणि उरी हल्ला झाला. पण मोदींनी दहाच दिवसात पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला”, असं अमित शाह म्हणाले.
‘मी शरद पवार यांना विचारु इच्छितो…’
“मी शरद पवार यांना विचारु इच्छितो, एक गोष्ट सांगा, 10 वर्षांपर्यत तुम्ही सोनिया, मनमोहन सरकारचे कर्ताधर्ता होते, तु्म्ही 10 वर्षात महाराष्ट्राला काय दिलं? नांदेडकरांनो हिशोब मागयाला हवा की नाही? त्यांनी हिशोब द्यायला हवा की नको? पण ते देणार नाहीत. पण मी हिशोब देवून जातो. त्यांनी 10 वर्षात महाराष्ट्राला 1 लाख 91 हजार कोटी रुपये दिले होते. नरेंद्र मोदी सरकारने 10 वर्षात 7 लाख 15 कोटी रुपये दिले आहेत. त्याऐवजी इन्फ्रास्ट्रकच्या विकासासाठी 3 लाख 90 हजार कोटी रुपये दिले. 75 हजार कोटी रुपये नॅशनल हायवेसाठी, 2 लाख 10 हजार कोटी रुपये रेल्वेसाठी, 4 हजार कोटी रुपये विमानतळासाठी आणि 1 लाख कोटी रुपये स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी प्रोजक्टसाठी देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्षाची मंडळी महाराष्ट्राचा विकास करु शकत नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचा विकास करु शकतात”, असा दावा अमित शाह यांनी केला.