काँग्रेस आता संपली? शरद पवार म्हणतात, थांबा, त्यांनी देशातल्या निवडणूक निकालाचा इतिहास सांगितला
शरद पवार पुढे म्हणाले की, देशात एवढे मोठे शेतकरी आंदोलन झाले. त्यात सर्वात जास्त शेतकरी हे पंजाबमधील होते. काही लोकांनी तिथल्या शेतकऱ्यांना आतंकवादी म्हटले. मात्र, देशासाठी बलिदान देणाऱ्यांमध्ये शीख बांधवाचा सहभाग मोठा आहे.
मुंबईः देशात अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवणडणुकीचा निकाल (Election result) आज लागला. यात फक्त पंजाब वगळता सारीकडे काँग्रेसचा सुपडा साफ झाला असून, भाजपच्या (BJP) विजयाच्या झेंडा फडकला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेषतः यात पंजाबसारखे हाती असलेले राज्य काँग्रेस गमावून बसली. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना मुंबईत पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा पवार यांनी देशातल्या निवडणूक निकालाच्या इतिहासाचा पाढाच पत्रकारांसमोर वाचला. शिवाय येणाऱ्या काळात आम्ही सारे पक्ष मिळून रणनिती ठरवू, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील जनादेश स्वीकारावा लागेल. पुढे नियोजन करावे लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला.
काय सांगितला इतिहास?
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमध्ये काँग्रेस पराभवाच्या छायेत आहे. खरेच काँग्रेसचे अस्तित्व संपले आहे का, असा प्रश्न शरद पवारांना विचारला असता. ते म्हणाले की, तुम्हाला मागच्या काही निवडणुकांची माहिती नसेल. मात्र, यापूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली. 1977 मध्ये देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, गुजरात अशी सगळीकडे काँग्रेसची सत्ता गेली. मात्र, त्यानंतर पुन्हा 1980 मध्ये झालेल्या निवडणूक काँग्रेस सत्तेत आली. तिथून पुढे काँग्रेस पुन्हा फॉर्ममध्ये आली. राजकारणात पक्ष कधी ना कधी हरतो. त्यामुळे फार निराश होण्याची गरज नाही. गोव्यातही काँग्रेसची ही स्थिती बदलेल याची खात्री आहे. सध्या पाच राज्यात पराभव झाला. त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील जनादेश स्वीकारावा लागेल. पुढे नियोजन करावे लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला.
पंजाब हातचे का गेले?
शरद पवार पुढे म्हणाले की, देशात एवढे मोठे शेतकरी आंदोलन झाले. त्यात सर्वात जास्त शेतकरी हे पंजाबमधील होते. काही लोकांनी तिथल्या शेतकऱ्यांना आतंकवादी म्हटले. देशासाठी बलिदान देणाऱ्यांमध्ये शीख बांधवाचा सहभाग मोठा आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांविषयी अशी पावले उचलली जाऊ नयेत. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. त्यामुळेच पंजाबच्या शेतकऱ्यांनी आम आदमी पार्टीला कौल दिला असावा, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. मात्र, यावेळी त्यांनी एव्हीएमबाबत बोलणे टाळले. काही लोकांच्या तक्रारी निश्चित आहेत. मात्र, जिंकल्यानंतर याबाबत तक्रारी नसतात. म्हणून मी आज ते पराभवाचे कारण आहे, असे म्हणणार नाही.
संबंधित बातम्या:
Elections Result | शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त, रावसाहेब दानवेंकडून शिवसेनेच्या मर्मावर बोट