पंधरा कोटी बजेटच्या चित्रपटाने कमावले 800 कोटींपेक्षाही जास्त; अभिनेत्रीने 19 व्या वर्षीच फिल्म इंडस्ट्रीला केला रामराम!
अवघ्या 15 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात तब्बल 858 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. मात्र या चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीने वयाच्या 19 व्या वर्षीच अभिनयक्षेत्राला रामराम केला. तिच्या या निर्णयाने चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला.
मुंबई : बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणारे असे फार कमी चित्रपट असतात, ज्यांना जगभरातून भरभरून प्रेम मिळतं. बॉलिवूडच्या अशा काही चित्रपटांनी केवळ भारतातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दमदार कथानक आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय याच्या जोरावर या चित्रपटांनी परदेशातही आपला डंका वाजवला. बॉलिवूडचा एक असाच चित्रपट जो कमी बजेटचा होता, पण बॉक्स ऑफिसवर त्याने कमाईचे विक्रम मोडले. अवघ्या 15 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात तब्बल 858 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. मात्र या चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीने वयाच्या 19 व्या वर्षीच अभिनयक्षेत्राला रामराम केला. तिच्या या निर्णयाने चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला.
हा चित्रपट म्हणजे 2017 मध्ये प्रदर्शित झालेला ‘सिक्रेट सुपरस्टार’. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान आणि किरण राव यांनी केली होती. तर अद्वैत चंदनने त्याचं दिग्दर्शन केलं होतं. यामध्ये झायरा वसिम, आमिर खान, मेहर विज आणि राज अरुण मुख्य भूमिकेत होते. ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाची कथा एका किशोरवयीन मुलीच्या आयुष्यावर आधारित आहे. तिला गायिका व्हायचं आहे, पण वडिलांच्या भीतीमुळे ती उघडपणे तिची आवड जपू शकत नाही. अखेर एके दिवशी बुरखा घालून ती युट्यूबवर तिच्या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट करते. या मुलीचा स्वप्न पूर्ण करण्याचा संघर्ष या चित्रपटात उत्तमरित्या दाखवण्यात आला आहे. त्यावेळी हा देशातील सर्वाधिक नफा कमावणारा चित्रपट ठरला होता.
View this post on Instagram
चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या झायरा वसिमने 2019 मध्ये फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला. धर्माचं कारण देत तिने अभिनयक्षेत्रात पुन्हा कधीच काम करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. झायराने दंगल, सीक्रेट सुपरस्टार आणि द स्काय इज पिंक या तीन चित्रपटांमध्ये काम केलं होतं. या तिन्ही चित्रपटांमधील तिच्या दमदार भूमिकेचं चाहत्यांकडून प्रचंड कौतुक झालं होतं. ‘दंगल’ हा तिचा पहिला चित्रपट होता, ज्यामध्ये तिने आमिर खानसोबत भूमिका साकारली होती.
झायराने सोशल मीडियावर लिहिलं होतं की ती तिच्या कामावर खूश नाही, कारण ते तिला तिच्या धर्मापासून दूर नेत आहे. तिने पुढे लिहिलं होतं की, अभिनेत्री बनल्यामुळे ती इस्लामपासून दूर होत आहे. यामुळे आता ती फिल्म इंडस्ट्री सोडत आहे. झायराला दहावीत 92 टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या तत्कालीन मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तिची भेट घेतली आणि तिचं अभिनंदन केलं होतं. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या होत्या की, ती काश्मीरच्या तरुणांसाठी आदर्श आहे.