Nitin Desai | “नितीन देसाई यांना कोणतं दु:ख सतावत..”; आदेश बांदेकर, किशोरी शहाणेंकडून खंत व्यक्त
नितीन देसाई हे त्यांच्या मनातील गोष्टी कोणाशी बोलून दाखवत नाहीत, याची खंतही किशोरी शहाणेंनी यावेळी व्यक्त केली. "तो मर्द माणूस होता. म्हणूनच ते कोणाकडे कधी मोकळेपणे व्यक्त झाले नाहीत. कुठलं दु:ख त्यांना सतावत होतं हे कोणालाच माहीत नव्हतं," असं त्या म्हणाल्या.
मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत कला दिग्दर्शनाचं उल्लेखनीय काम करणाऱ्या नितीन देसाई यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. “ही खूप वाईट आणि दुर्दैवी बातमी आहे. त्यांच्याकडे प्रत्येक जण अत्यंत अभिमानाने बघत होतं. एक मराठी माणूस इतकं मोठं स्वप्न बघतो आणि ती स्वप्नपूर्ती करताना सर्वांशी उत्तम नातं जोडतो, हे पाहून खूप आनंद व्हायचा. मात्र त्यांचं असं कोणाशी काहीच न बोलता जाणं खूप क्लेशकारक आहे”, अशा शब्दांत आदेश बांदेकर यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
“नितीन देसाई यांनी महाराष्ट्रात मोठा आणि उत्तम स्टुडिओ उभा केला. अनेक मोठमोठ्या मालिका आणि चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. कुठल्याही सोहळ्यासाठी फोन केला तर कधीच ते नकार द्यायचे नाहीत”, असंही ते पुढे म्हणाले. अभिनेत्री किशोरी शहाणे यांनाही नितीन देसाई यांच्या निधनाच्या वृत्ताने मोठा धक्का बसला आहे. “मला अजूनही विश्वास बसत नाहीये. माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. ज्या माणसाकडे आपण इतक्या अभिमानाने बघतो, त्यांनी कला दिग्दर्शन क्षेत्राला लौकिक मिळवून दिलं, लोकं स्वप्न बघू लागली, त्यांच्यासारखं बनलं पाहिजे असं अनेकांना वाटायचं. एनडी स्टुडिओसारखा इतका मोठा सेटअप निर्माण करणं ही काही साधी गोष्ट नाही. आपल्या प्रत्येक कामात ते सर्वांना सोबत घेऊन चालत होते. माझं त्यांच्याशी घरोब्याचं नातं होतं. आमच्यात अनेकदा गप्पा व्हायच्या. पण ते असं पाऊल उचलतील यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही”, असं त्या म्हणाल्या.
View this post on Instagram
नितीन देसाई हे त्यांच्या मनातील गोष्टी कोणाशी बोलून दाखवत नाहीत, याची खंतही किशोरी शहाणेंनी यावेळी व्यक्त केली. “तो मर्द माणूस होता. म्हणूनच ते कोणाकडे कधी मोकळेपणे व्यक्त झाले नाहीत. कुठलं दु:ख त्यांना सतावत होतं हे कोणालाच माहीत नव्हतं. ते स्वत: त्यावर मार्ग शोधतील यावर ठाम होते. इतकं खंबीर त्यांचं व्यक्तीमत्त्व होतं. पण जर त्यांनी गोष्टी जवळच्या व्यक्तींसोबत शेअर केल्या असत्या, तर काही ना काही मार्ग निघाला असता”, असं त्या पुढे म्हणाल्या.