“माझं करिअर संपवण्यासाठी सलमान-शाहरुखने..”; आमिर खानचा धक्कादायक खुलासा
अभिनेता आमिर खान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या 'दंगल' या चित्रपटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. यावेळी त्याने सलमान खान आणि शाहरुख खान यांचाही उल्लेख केला. त्या दोघांनी माझ्याविरोधात कट रचला.. असं तो मस्करीत म्हणाला.

अभिनेता आमिर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या नऊ वर्षांनंतरही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. आमिरने यात कुस्तीपटू बबिता आणि गीता फोगट यांच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे बॉक्स ऑफिसवर कमाईचा हा विक्रम रचलेल्या चित्रपटाची ऑफर सुरुवातीला आमिरने नाकारली होती. ‘दंगल’ची स्क्रीप्ट ऐकल्यानंतर आमिरने त्या भूमिकेला स्पष्ट नकार दिला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. शाहरुख खान आणि सलमान खान यांनी माझं करिअर संपवण्यासाठी मला चार मुलींच्या 55 वर्षीय पित्याची भूमिकेची ऑफर दिली, असा विनोद त्याने दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्यासोबत केला.
‘जस्ट टू फिल्मी’ या युटयूब चॅनलवर आमिर म्हणाला, “दंगल या चित्रपटाच्या आधी मी यशराज फिल्म्सच्या ‘धूम 3’मध्ये भूमिका साकारली होती. त्यासाठी मला माझ्या शरीरयष्टीवर प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. अत्यंत फिट दिसणाऱ्या आणि माझ्या वयापेक्षा तरुण वाटणाऱ्या शरीरयष्टीसाठी इतकी मेहनत घेतल्यानंतर मी अशी भूमिका साकारण्यासाठी तयार नव्हतो, ज्यात मला पुन्हा वजन वाढवावं लागेल. मला जर प्रेक्षकांची मनं जिंकायची असती तर मी दंगल हा चित्रपट कधीच केला नसता. मी एका वयस्कर, जाड आणि केस पांढरे झालेल्या व्यक्तीची भूमिका त्यात साकारली आहे. किंबहुना मी नितेशला म्हटलं होतं की, ही चांगली कथा आहे. मला ती भूमिका साकारायची आहे पण मी आताच धूम 3 हा चित्रपट केल्याने सध्या एकदम टनाटन (फिट) दिसतोय. आता माझं बॉडी फॅट 9.6 टक्के आहे आणि आता तू मला 55 वर्षीय म्हाताऱ्या, जाड आणि चार मुलींच्या पित्याची भूमिका साकारायला लावतोय?”
चित्रपटाविषयी बोलताना आमिर पुढे शाहरुख आणि सलमानवरून विनोद करतो. “मी नितेशला म्हटलं की तुम्हाला शाहरुखच्या लोकांनी माझ्याकडे पाठवलंय. माझ्या मते सलमान आणि शाहरुखने तुम्हाला माझ्याकडे हे म्हणून पाठवलंय की, याला 60 वर्षांच्या म्हाताऱ्याची भूमिका द्या आणि या इंडस्ट्रीतून काढून टाका. मी त्या वयापेक्षा तरुण दिसत असल्याने भूमिकेला नकार दिला होता. मी नितेशला असंही म्हटलं होतं की 10-15 वर्षांनंतर हा चित्रपट बनव. त्याने होकारसुद्धा दिला होता पण कथा मला खूप भावली होती. तेव्हा मी म्हणालो, नितेशजी.. चला करुयात.. काय होईल ते पुढचं पुढे पाहू”, असं आमिरने सांगितलं.




“त्या चित्रपटाचं शूटिंग करताना माझं खरं वयसुद्धा 55 होतं. त्यामुळे माझं सत्य लोकांसमोर येईल असं मला वाटत होतं. प्रेक्षकांना वाटेल की मी खरा असाच आहे, धूम 3 मधल्या आमिरसारखा नाही. हाच माझा संकोच होता. माझ्या खऱ्या वयाशी जुळणारी ती भूमिका होती,” असंही आमिर पुढे म्हणाला.