देओल कुटुंबातील स्त्रियांना ‘या’ गोष्टीची परवानगी नाही..; अभय देओलचा खुलासा
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभय त्याच्या कुटुंबाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. देओल कुटुंबीय हे संकुचित विचारांचं असल्याचं त्याने म्हटलंय. घरातील स्त्रियांना काम करण्याची परवानगी होती पण फिल्म इंडस्ट्रीत नाही, असं तो म्हणाला.
चित्रपटसृष्टीतील देओल कुटुंब हे अत्यंत प्रतिष्ठित कुटुंब म्हणून ओळखलं जातं. धर्मेद्र यांच्यानंतर सनी देओल, बॉबी देओल आणि अभय देओल या भावंडांनी अनेक दमदार चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यातही अभय देओलच्या चित्रपटांची आणि भूमिकांची निवड ही देओल कुटुंबातील इतर कलाकारांपेक्षा थोडीफार वेगळीच राहिली आहे. याविषयी तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला. ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत अभय म्हणाला की तो लहानपणापासूनच बंडखोर करणारा मुलगा आहे. इतकंच नव्हे तर त्याच्या चित्रपटांच्या निवडीमुळे कुटुंबीयांना त्याच्याविषयी काळजी वाटू लागली होती, असाही खुलासा त्याने केला. या मुलाखतीत अभय आणखी एका महत्त्वाच्या विषयावर व्यक्त झाला, ते म्हणजे देओल कुटुंबातील स्त्रियांच्या करिअरविषयी. “देओल कुटुंबातील महिलांना काम करण्याची परवानगी आहे, पण चित्रपटांमध्ये नाही”, असं तो म्हणाला.
“आमचे कुटुंबीय फार संकुचित विचारांचे होते. आम्ही एकत्र कुटुंबात राहायचो आणि त्यात आम्ही सात मुलं होतो. वडील आणि काका यांच्यामुळे लहानपणापासूनच मला चित्रपटसृष्टी समजू लागली होती. त्यांची सुरुवात मात्र खूप लहानापासून झाली होती. ते गावातून आले होते आणि त्यांच्यासाठी मोठं शहर आणि ग्लॅमरचं विश्व हे खूप नवीन होतं. त्यांना त्यांच्या छोट्या शहरातील मूल्यांना धरून ठेवायचं होतं, त्यामागचं कारण मी आता समजू शकतो. तेव्हा मला समजत नव्हतं की ते आम्हाला फिल्मी पार्ट्यांना जायला नकार का द्यायचे? किंवा इंडस्ट्रीतील इतर स्टारकिड्ससोबत फिरायला नकार का द्यायचे? ते आमच्याच भल्यासाठी असं करत होते, पण तेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल माझ्या मनात खूप संभ्रम होता”, असं अभय म्हणाला.
View this post on Instagram
देओल कुटुंबीयांविषयी अभय पुढे म्हणाला, “मला अभिनेता बनायचं होतं आणि या निर्णयाचं त्यांना फारसं आश्चर्य वाटलं नव्हतं. कारण ते नेहमी हेच म्हणायचे की मी वकील किंवा अभिनेता बनावं. तुम्ही जर बॉबी किंवा सनी देओलला विचारलंत तर ते तुम्हाला हेच म्हणतील की मी खूप वाद घालतो. मी सुरुवातीला डावखुरा होतो आणि त्यांनी मला उजव्या हाताने सगळ्या गोष्टी करायला भाग पाडलं. मी त्यांना सतत याविषयी प्रश्न विचारायचो. करिअरच्या सुरुवातीला मी जे चित्रपट निवडायचो, त्याबद्दल त्यांना काळजी वाटू लागली होती. मी त्या मार्गाला जाऊ नये, यासाठी ते माझी काळजी घेत होते. माझ्या वडिलांना माझी फार चिंता वाटायची. त्यांना माझा मनोरमा हा चित्रपट अजिबात आवडला नव्हता. “