लग्नाची कॅन्सरशी तुलना करण्याबाबत अभिषेक बच्चन म्हणाला “शेवटच्या क्षणापर्यंत..”
गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत. या चर्चांदरम्यान अभिषेकने केलेलं हे वक्तव्य नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. यावेळी अभिषेक त्याच्या विनोदी स्वभावाविषयीही मोकळेपणे व्यक्त झाला.
अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच ‘आय वाँट टू टॉक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याने चौकटीबाहेरची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पिकू’ फेम दिग्दर्शक शूजित सरकार यांच्या या चित्रपटात त्याने कॅन्सरग्रस्ताची भूमिका साकारली आहे. कॅन्सरचं निदान झालेल्या व्यक्तीकडे जगण्यासाठी फक्त 100 दिवस शिल्लक असतात, अशी ही भूमिका आहे. शूजित यांच्या खऱ्या आयुष्यातील मित्राची ही खरी कथा आहे. या चित्रपटातील भूमिकेबद्दल अभिषेक नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला. यावेळी त्याने शूजितच्या त्या मित्राचा एक किस्सा सांगितला. त्या मित्राने कॅन्सरची तुलना लग्नाशी केली होती. या तुलनेनं अभिषेकही भारावला होता.
आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. त्यामुळे अनेकदा विनोद खूप कामी येतो, असं अभिषेक यावेळी म्हणाला. कठीण काळाबद्दल रडत बसण्यापेक्षा, स्वत:कडे पीडित म्हणून पाहण्यापेक्षा चेहऱ्यावर हास्य ठेवून पुढे जाण्याचा मार्ग निवडेन, असंही त्याने सांगितलं. यावेळी त्याने शूजितच्या मित्राचा किस्सा सांगितला. “आम्ही लॉस एंजिलिसच्या सीमेबाहेर शूटिंग करत होतो. तिथेच आम्ही चित्रपटाचा एक भाग शूट केला होता. त्यावेळी ते मला म्हणाले की, हे आनंदी लग्न नाही पण तरी एक लग्न आहे. कॅन्सरबद्दल विचार करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे, असं मला वाटलं. मी त्यांना विचारलं की, तुम्ही असं का म्हणत आहात? त्यावर ते म्हणाले, अखेरच्या श्वासापर्यंत सोबत राहतं. मला हे खूपच विलक्षण वाटलं. अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही विवाहित असता. अशा भूमिकांबद्दल आणखी खोलवर जाणून घेण्याची तुमची इच्छा का नाही होणार सांगा”, असा सवाल त्याने केला.
View this post on Instagram
अभिषेक दिग्दर्शक आणि त्याच्या स्वभावातील एक समान गुण ओळखत पुढे म्हणाला, “आम्ही दोघंही खूप विनोदी स्वभावाचे आहोत. अशा स्वभावाची व्यक्ती प्रत्येक गंभीर परिस्थितीला हलकंफुलकं करण्याचा प्रयत्न करते. पण अनेकदा या स्वभावाचा वापर ती व्यक्ती स्वत:च्या बचावासाठीही करत असते. आयुष्य हे असंच आहे. तुम्हाला हे समजायला फार वेळ लागत नाही की तुमच्याच काही गोष्टी बदलण्याची क्षमता किंवा सामर्थ्य नाही. तुम्हाला फक्त त्याचा सामना करायला शिकावं लागतं. एक प्रसिद्ध म्हण आहे की, तुम्ही वाऱ्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. तुम्हाला तुमच्या जहाजाची दिशा बदलून पुढे चालत राहावं लागतं.”