Adipurush | ‘रामायण-कुराणसारखे धार्मिक ग्रंथ तरी सोडा’; कोर्टाने ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांना फटकारलं
या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. शिवाय प्रभास, क्रिती सनॉन, सैफ अली खान यांसारख्या कलाकारांकडून रामायणाची कथा कशी साकारली जाईल, हे अनेकांना पाहायचं होतं. ‘आदिपुरुष’ जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा मात्र प्रेक्षकांची निराशा झाली.
लखनऊ : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन दहा दिवस झाले तरी त्यावरून अद्याप वाद सुरूच आहे. रामायण या महाकाव्यावर आधारित चित्रपटातील कलाकारांचा लूक, सीन्स आणि डायलॉगवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला. वाढता विरोध पाहून अखेर निर्मात्यांनी चित्रपटातील संवाद बदलले. मात्र अजूनही या चित्रपटाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात या चित्रपटावर पूर्ण बंदी घालण्यासाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यावर नुकतीच सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने चित्रपटाचे निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाला चांगलंच फटकारलं आहे.
हायकोर्टात चित्रपटाविरोधात याचिका
आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मात्र प्रदर्शनानंतर चित्रपटाच्या कायदेशीर अडचणीही वाढल्या. उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कथेवरून आक्षेप घेण्यात आला. आदिपुरुषमध्ये प्रभू श्रीराम यांची कथा बदलून ती अयोग्य पद्धतीने दाखवल्याचं त्यात म्हटलं गेलं आहे. याचिकाकर्ते कुलदीप तिवारी यांनी चित्रपटात सुधारणा करून लेखक मनोज मुंतशीर यांना पक्षकार बनवण्याची विनंती केली होती.
कोर्टाने निर्मात्यांना आणि सेन्सॉर बोर्डाला फटकारलं
सुनावणीदरम्यान सोमवारी कोर्टाने सवाल केला की, “सेन्सॉर बोर्डाला नेमकं काय दाखवायचं आहे? बोर्डाला स्वत:च्या जबाबदाऱ्या माहीत नाहीत का? चित्रपट हा समाजाचा आरसा असतो हे सेन्सॉर बोर्डाला माहीत नाही का? पुढच्या पिढीला तुम्हाला काय शिकवायचं आहे? फक्त रामायणच नाही तर कुराण, गुरू ग्रंथ साहिब, गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथांना तरी कमीत कमी सोडा.” इतकंच नव्हे तर सुनावणीदरम्यान चित्रपटाचे निर्माते अनुपस्थित राहिल्यावरूनही कोर्टाने फटकारलं. याप्रकरणी पुढील सुनावणी 27 जून रोजी होणार आहे.
‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला. या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. शिवाय प्रभास, क्रिती सनॉन, सैफ अली खान यांसारख्या कलाकारांकडून रामायणाची कथा कशी साकारली जाईल, हे अनेकांना पाहायचं होतं. ‘आदिपुरुष’ जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा मात्र प्रेक्षकांची निराशा झाली. ‘रामायण’ कसं दाखवू नये, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘आदिपुरुष’ अशी टिप्पणी अनेकांकडून झाली. सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच विविध सेलिब्रिटींनीही या चित्रपटातील सीन्स आणि डायलॉग्सवर आक्षेप नोंदविला आहे.