Adipurush | ‘आदिपुरुष’ OTT वर प्रदर्शित होणार नाही? मोदींपर्यंत पोहोचलं पत्र, टीमवर FIR दाखल करण्याची मागणी
या पत्रात पुढे लिहिलं आहे की, 'प्रभू श्रीराम हे भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी देव आहेत. मात्र आदिपुरुष या चित्रपटात श्रीराम आणि रावणसुद्धा एखाद्या व्हिडिओ गेममधील पात्र वाटतात. या चित्रपटातील संवादसुद्धा जगभरातील भारतीय लोकांच्या भावना दुखावत आहेत.'
नवी दिल्ली : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रामायण या महाकाव्यावर आधारित या चित्रपटातील कलाकारांचे डायलॉग, त्यांचा लूक आणि VFX वरून प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. आता या चित्रपटावर आणखी एक संकट आलं आहे. ‘आदिपुरुष’विरोधात आता ‘ऑल इंडिया सिने वर्कर असोसिएशन’ने (AICWA) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात ‘आदिपुरुष’मध्ये दाखवलेल्या आक्षेपार्ह गोष्टींबाबत सविस्तरपणे लिहिण्यात आलं आहे. त्याचसोबत दिग्दर्शक ओम राऊत यांच्याविरोधात FIR दाखल करून चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. ‘आदिपुरुष’मध्ये प्रभासने राघव (राम), क्रिती सनॉनने जानकी (सीता), सैफ अली खानने लंकेश (रावण), सनी सिंहने शेष (लक्ष्मण) आणि देवदत्त नागेनं बजरंगची (हनुमान) भूमिका साकारली आहे.
AICWA चे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रात लिहिलं आहे की, ‘आदिपुरुष या चित्रपटावर तातडीने बंदी आणावी, हे आपलं रामायण नाही. या चित्रपटाच्या स्क्रीनप्ले आणि डायलॉग यांमधून स्पष्टपणे प्रभू श्रीराम आणि हनुमान यांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे हिंदू आणि सनातन धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. म्हणूनच या चित्रपटाची स्क्रिनिंग तातडीने थांबवावी.’
या पत्रात पुढे लिहिलं आहे की, ‘प्रभू श्रीराम हे भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी देव आहेत. मात्र आदिपुरुष या चित्रपटात श्रीराम आणि रावणसुद्धा एखाद्या व्हिडिओ गेममधील पात्र वाटतात. या चित्रपटातील संवादसुद्धा जगभरातील भारतीय लोकांच्या भावना दुखावत आहेत. आम्ही माननीय पंतप्रधान यांना आवाहन करतो की या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी आणि भविष्यात त्याला ओटीटीवरील कोणत्याच प्लॅटफॉर्ममध्ये प्रदर्शित केला जाऊ नये.’
या पत्रात FIR विषयी लिहिलं, ‘चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, लेखक मनोज मुंतशीर आणि निर्मात्यांविरोधात FIR दाखल करण्याची आमची मागणी आहे. अभिनेता प्रभास, क्रिती स नॉन आणि सैफ अली खान यांनी इतिहासातील सर्वात लज्जास्पद चित्रपटाचा भाग व्हायला पाहिजे नव्हतं. आदिपुरुष हा चित्रपट म्हणजे प्रभू श्रीराम आणि रामायणबद्दल असलेल्या आमच्या विश्वासावर केलेला आघात आहे.’
‘आदिपुरुष’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दमदार कमाई केली. मात्र सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाल्यानंतर चौथ्या दिवसाच्या कमाईत घट झाल्याचं पहायला मिळालं. चौथ्या दिवशी या चित्रपटाने फक्त 20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.