Adipurush | प्रदर्शनापूर्वीच ‘आदिपुरुष’ची बक्कळ कमाई; ओम राऊतचा चित्रपट ठरणार ब्लॉकबस्टर?
ओम राऊत दिग्दर्शित बिग बजेट 'आदिपुरुष' हा चित्रपट येत्या 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने रग्गड कमाई केल्याचं कळतंय. हा चित्रपट तब्बल 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे.
मुंबई : दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. येत्या 16 जून रोजी देशभरातील थिएटर्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रभास, क्रिती सनॉन, सनी सिंग, सैफ अली खान आणि देवदत्त नागे यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाणी आधीच सोशल मीडियावर गाजत आहेत. आता प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने तगडी कमाई केल्याची माहिती समोर येत आहे. आदिपुरुष हा चित्रपट तब्बल 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. प्रदर्शनापूर्वीच बजेटच्या अर्ध्यापेक्षा जास्त रकमेची कमाई या चित्रपटाने केली आहे.
‘आदिपुरुष’ने नॉन-थिएट्रिकल रेव्हेन्यूद्वारे 247 कोटी रुपयांची कमाई केल्याचं कळतंय. यामध्ये सेटेलाइट राइट्स, म्युझिक राइट्स, डिजिटल राइट्स आणि इतर सहाय्यक अधिकार यांचा समावेश आहे. याशिवाय दक्षिणेत या चित्रपटाची कमाई जवळपास 185 कोटी रुपये होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशा पद्धतीने 432 कोटींची कमाई आधीच झाल्याचं म्हटलं जातंय.
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. यामध्ये प्रभासने राघव, क्रिती सनॉने जानकी, सनी सिंगने लक्ष्मण आणि सैफ अली खानने लंकेशची भूमिका साकारली आहे. येत्या 16 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जानेवारी महिन्यातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र टीझरवर आलेल्या प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिसादानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पाच ते सहा महिन्यांची मुदत वाढवून घेतली.
“त्या पाच – सहा महिन्यांचा कालावधी मिळणे ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आव्हानं प्रत्येक गोष्टीत असतात. पण ही आव्हानं आमच्या चित्रपटाला अधिक चांगला आणि मजबूत बनवेल. आम्ही अशा तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे जो मार्व्हल, डीसी, अवतार यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवला गेला”, असं ओम राऊत म्हणाले.
रामायणाची कथा सर्वांनाच माहीत आहे. मात्र ‘आदिपुरुष’मध्ये ती नव्या ढंगाने मांडण्यात आली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील व्हिएफएक्स हे टीझरपेक्षा उत्तम असल्याचं सहज दिसून येत आहे. यातील कलाकारांच्या लूकमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफचा साधूमधील वेशांतर केलेला लूक ट्रेलरमध्ये पहायला मिळतो. मात्र सैफचा दुसरा लूक अद्याप ट्रेलरमध्ये पूर्णपणे दाखवण्यात आलेला नाही.