Adipurush | ‘आदिपुरुष’च्या VFX बद्दल ओम राऊतने केला खुलासा; प्रेक्षकांच्या टीकांनंतर उचललं ‘हे’ पाऊल
हा चित्रपट 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. टीझरमधील VFX वरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली होती.
मुंबई : ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या बिग बजेट चित्रपटातील व्हीएफएक्सवर प्रेक्षकांनी जोरदार टीका केली होती. या चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला होता. देशभरातून तीव्र विरोध झाल्यानंतर अखेर निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आणि चित्रपटात अपेक्षित बदल करण्याचा निर्णय घेतला. आता या बदलांबाबत दिग्दर्शक ओम राऊतने प्रतिक्रिया दिली आहे. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केल्याचं त्याने सांगितलं.
“त्या पाच – सहा महिन्यांचा कालावधी मिळणे ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आव्हानं प्रत्येक गोष्टीत असतात. पण ही आव्हानं आमच्या चित्रपटाला अधिक चांगला आणि मजबूत बनवेल. आम्ही अशा तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे जो मार्व्हल, डीसी, अवतार यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवला गेला”, असं ओम राऊत म्हणाला.
या चित्रपटाची निर्मिती टी-सीरिजने केली आहे. टी-सीरिजचे निर्माते भूषण कपूर चित्रपटाविषयी म्हणाले, “सुरुवातीला मिळालेला नकारात्मक प्रतिसाद नेहमीच पुढे जाऊन कामी येतो. आम्ही थोडे निराश झालो होतो. पण आम्ही पुन्हा चित्रपटावर मेहनत घेतली. घडलेल्या गोष्टींमधून आम्ही शिकलो आणि त्यातून पुढे येण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांनी सुचवलेल्या गोष्टींनुसार आम्ही काही बदल केले. आता आम्ही जो चित्रपट बनवला आहे, त्यावर खूप खुश आहोत.”
View this post on Instagram
रामायण या पौराणिक कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात अभिनेता प्रभासने राम, क्रिती सनॉनने सीता आणि सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर निर्मात्यांनी ‘आदिपुरुष’चा लिरिकल मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. काही सेकंदांच्या या व्हिडीओने चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त झाली.
‘आदिपुरुष’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कलाकारांचे लूक पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. त्याच्याही लूकवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. सैफ अली खानच्या दाढीची तुलना नेटकऱ्यांनी मुघलांशी केली होती. हा वाद नंतर इतका वाढला की निर्मात्यांना प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली.
हा चित्रपट 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. टीझरमधील VFX वरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली होती. त्यानंतर चित्रपटाच्या टीमने व्हिएफएक्सवर आणखी मेहनत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे येत्या 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.