Adipurush | प्रदर्शनापूर्वी ‘आदिपुरुष’च्या टीमचा मोठा निर्णय; ‘या’साठी थिएटर्समध्ये ठेवणार एक जागा राखीव
'आदिपुरुष' या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. चित्रपटाच्या शोदरम्यान प्रत्येक थिएटरमधील एक जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. या जागेचं तिकिट विकलं जाणार नाही, कारण..
मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. रामायणावर आधारित या बिग बजेट चित्रपटात साऊथ सुपरस्टार प्रभास, क्रिती सनॉन, सैफ अली खान आणि देवदत्त नागे यांच्या भूमिका आहेत. येत्या 16 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शनाच्या काही दिवस आधीच आदिपुरुषच्या निर्मात्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आदिपुरुषच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान प्रत्येक थिएटरमधील एक सीट ही हनुमानासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. या सीटचं तिकिट कोणालाच विकलं जाणार नाही.
“रामायणाची कथा जिथे जिथे सांगितली जाते, तिथे हनुमान असतात असा आमचा विश्वास आहे. या विश्वासामुळे आम्ही थिएटरमधील एक जागा ही हनुमानासाठी राखीव ठेवणार आहोत. त्या सीटचं तिकिट कोणालाच विकलं जाणार नाही. रामाच्या सर्वांत मोठ्या भक्तासाठी आम्ही हे पाऊल उचलतोय”, असं टीमकडून स्पष्ट करण्यात आलं.
View this post on Instagram
या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाणी आधीच सोशल मीडियावर गाजत आहेत. आता प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने तगडी कमाई केल्याची माहिती समोर येत आहे. आदिपुरुष हा चित्रपट तब्बल 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. प्रदर्शनापूर्वीच बजेटच्या अर्ध्यापेक्षा जास्त रकमेची कमाई या चित्रपटाने केली आहे. ‘आदिपुरुष’ने नॉन-थिएट्रिकल रेव्हेन्यूद्वारे 247 कोटी रुपयांची कमाई केल्याचं कळतंय. यामध्ये सेटेलाइट राइट्स, म्युझिक राइट्स, डिजिटल राइट्स आणि इतर सहाय्यक अधिकार यांचा समावेश आहे. याशिवाय दक्षिणेत या चित्रपटाची कमाई जवळपास 185 कोटी रुपये होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशा पद्धतीने 432 कोटींची कमाई आधीच झाल्याचं म्हटलं जातंय.
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. यामध्ये प्रभासने राघव, क्रिती सनॉने जानकी, सनी सिंगने लक्ष्मण आणि सैफ अली खानने लंकेशची भूमिका साकारली आहे. येत्या 16 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जानेवारी महिन्यातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र टीझरवर आलेल्या प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिसादानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पाच ते सहा महिन्यांची मुदत वाढवून घेतली.