Adipurush | हनुमानजींवर बसले राम, असं कधी घडलं? ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरवर भडकले रामायणाचे लक्ष्मण
रामायणावर आधारित या चित्रपटात प्रभासने राम, क्रिती सनॉनने सीता आणि सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे यामध्ये हनुमानाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट येत्या 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. ‘आदिपुरुष’च्या हिंदी व्हर्जनला अवघ्या 24 तासांत 52.2 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे युट्यूबवर सर्वाधिक पाहिला गेलेला हा हिंदी ट्रेलर ठरला आहे. एकीकडे अनेकांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर दुसरीकडे असेही काही लोक आहेत, ज्यांना हा ट्रेलर अल्ट्रा-मॉर्डन वाटतोय. आदिपुरुष हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी यांनी मात्र ट्रेलरवर निराशा व्यक्त केली आहे.
“लोकांच्या भावनांशी छेडछाड करू नका”
एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सुनील लहरी यांनी म्हटलंय की, “आदिपुरुषचा ट्रेलर हा पहिल्यापेक्षा चांगला आहे. मात्र हा चित्रपट मॉडर्न बनवण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे. प्रत्येक व्यक्तीचा दृष्टीकोन आणि समज वेगवेगळी असू शकते पण रामायणाबद्दल लोकांच्या ज्या भावना आहेत त्यांच्याशी जास्त छेडछाड झाली नाही पाहिजे. असं झाल्यास प्रेक्षकांच्या भावना दुखावतील.” सुनील लहरी यांनी पुढे असंही म्हटलंय की त्यांनी हा चित्रपट अद्याप पाहिला नाही, त्यामुळे त्या चित्रपटाच्या अप्रोचबद्दल त्यांना स्पष्टता नाही.
“श्रीराम हे हनुमानजींच्या खांद्यावर बसून बाण सोडत नाहीत”
“सध्या जी परिस्थिती आहे त्यानुसारच निर्मात्यांनी काम केलं पाहिजे. ट्रेलरमधील काही गोष्टी मला अजिबात आवडल्या नाहीत. हनुमानजी यांच्यावर रामजी यांना बसवलं आहे आणि ते बाण सोडत आहेत. मी आतापर्यंत जितकं रामायण पाहिलंय आणि वाचलंय, त्यात कुठेच असं नाही म्हटलंय. लक्ष्मणजी यांनी त्यांच्यावर बसून बाण सोडलं होतं. हनुमानजी यांच्या आग्रहानंतर राम-लक्ष्मण त्यांच्या खांद्यावर बसतात. मात्र हनुमान यांच्या खांद्यावर बसून रामजींना कधीच बाण सोडताना पाहिलं गेलं नाही. व्हिएफएक्स टेक्नॉलॉजीसोबत पौराणिक कथेची सरमिसळ करण्याचा प्रयत्न केला आहे. यात वाईट काहीच नाही, पण कथेचं मूळ खराब करू नये”, असंही ते म्हणाले.
पहा ट्रेलर
वेशभूषेवर व्यक्त केली नाराजी
सुनील लहरी यांनी वेशभूषेवरही नाराजी व्यक्त केली आहे. वनवासादरम्यान रामजींनी संपूर्ण कपडे परिधान केल्याचं ट्रेलरमध्ये दाखवलंय. मात्र वनवासादरम्यान ते फक्त भगव्या वस्त्रांमध्ये होते, असं लहरींनी नमूद केलंय. रामायणावर आधारित या चित्रपटात प्रभासने राम, क्रिती सनॉनने सीता आणि सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे यामध्ये हनुमानाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट येत्या 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.