Ramayan | कमाईच्या बाबतीत ‘आदिपुरुष’च्याही पुढे टीव्हीचं ‘रामायण’; इतक्या कोटी रुपयांचं होतं बजेट
रामायणने प्रत्येक एपिसोडसाठी बराच नफा कमावला होता. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, या मालिकेला 53 विविध देशांमधील तब्बल 650 दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिलं आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास, क्रिती सनॉन, सनी सिंह, सैफ अली खान, देवदत्त नागे, सोनल चौहान, तेजस्विनी पंडित यांच्या भूमिका आहेत.
मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे सध्या देशभरात रामायण या महाकाव्याची चर्चा होत आहे. रामायणापासून प्रेरणा घेऊन आम्ही हा चित्रपट बनवला, असा दावा या चित्रपटाचे संवादलेखक मनोज मुंतशीर यांनी केला. मात्र प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांनी चित्रपटात दाखवलेल्या काही दृश्यांवरून, कलाकारांच्या लूकवरून आणि डायलॉगवरून जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक आता त्याची तुलना रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेशी करू लागले. आजसुद्धा या मालिकेची आणि त्यातील कलाकारांची प्रचंड लोकप्रियता आहे. या मालिकेशी प्रेक्षक भावनिकरित्या जोडले गेले आहेत. या मालिकेनं केवळ लोकप्रियताच नाही तर प्रचंड नफासुद्धा कमावला होता. या मालिकेची कमाई ‘आदिपुरुष’ या चित्रपटापेक्षाही अधिक असल्याची माहिती समोर येत आहे.
रामायण या मालिकेचं बजेट
रामानंद सागर यांनी छोट्या पडद्यावर रामायण साकारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी प्रत्येक एपिसोड बनवण्यासाठी जवळपास 9 लाख रुपये खर्च केले होते. या हिशोबाने संपूर्ण मालिकेचा खर्च हा जवळपास 7 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्याकाळी ही रक्कम सर्वसामान्य मालिका किंवा चित्रपटांपेक्षा बरीच जास्त होती. त्याकाळचे 9 लाख रुपये म्हणजे आजच्या काळातील जवळपास 1 कोटी रुपये. रामायण या मालिकेचा पहिला एपिसोड 25 जानेवारी 1987 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर कोरोना काळात पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
मालिकेची कमाई
रामायणने प्रत्येक एपिसोडसाठी बराच नफा कमावला होता. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, या मालिकेला 53 विविध देशांमधील तब्बल 650 दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिलं आहे. तर इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, या मालिकेनं दूरदर्शनवर पहिल्याच रनमध्ये 23 कोटी रुपये कमावले होते. त्याशिवाय आतापर्यंत जवळपास 30-35 कोटी रुपयांची कमाई आतापर्यंत झाली आहे. त्यामुळे रामानंद सागर यांच्या मालिकेनं जवळपास तिप्पट नफा कमावला होता.
बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरुष’ला थंड प्रतिसाद
ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास, क्रिती सनॉन, सनी सिंह, सैफ अली खान, देवदत्त नागे, सोनल चौहान, तेजस्विनी पंडित यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी जगभरात तब्बल 140 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. मात्र जसजशी सोशल मीडियावर त्याची नकारात्मक पब्लिसिटी होऊ लागली, तशी कमाईत घट पहायला मिळाली. 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आतापर्यंत 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करू शकला आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 400 कोटींच्या घरात पोहोचला आहे.