Adipurush | ‘बजरंगबली देव नाही तर भक्त’; ‘आदिपुरुष’च्या लेखकाच्या नव्या वक्तव्यावर भडकले नेटकरी
मनोज मुंतशीर यांच्या या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 'सर्वांत आधी या माणसाने मुलाखती देणं बंद केलं पाहिजे', असं एकाने लिहिलं. तर 'त्यांच्या अशा वक्तव्यांमुळेच चित्रपटाचं आणखी नुकसान होतंय', असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.
मुंबई : अभिनेता प्रभास आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेचा विषय ठरला आहे. रामायण या महाकाव्यापासून प्रेरणा घेऊन ‘आदिपुरुष’ हा चित्रपट बनवल्याचं वक्तव्य केल्यानंतर आता लेखक मनोज मुंतशीर पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. सोशल मीडियावर सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते हनुमानाविषयी बोलताना दिसत आहेत. “हनुमान भगवान नहीं भक्त है”, या त्यांच्या वक्तव्यानुसार नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. इतकंच नव्हे तर मनोज मुंतशीर यांना मुलाखती देण्यापासून थांबवा, असंही काहींनी म्हटलंय.
“हनुमान देव नाहीत, तर भक्त आहेत”
‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत मनोज मुंतशीर यांनी असा दावा केला आहे की हनुमान हे देव नाहीत तर भक्त आहेत. “बजरंग बली देव नाहीत, भक्त आहेत. आपण त्यांना देव बनवलं आहे”, असं ते म्हणाले. या चित्रपटातील हनुमानाच्या डायलॉग्सवरूनही अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यावर मुंतशीर स्वत:चा बचाव करत पुढे म्हणाले, “हनुमानजी प्रभू श्रीरामासारखे संवाद नाही साधायचे. बजरंगबली दर्शनिक बातें नहीं करते है.”
नेटकऱ्यांकडून ट्रोल
मनोज मुंतशीर यांच्या या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘सर्वांत आधी या माणसाने मुलाखती देणं बंद केलं पाहिजे’, असं एकाने लिहिलं. तर ‘त्यांच्या अशा वक्तव्यांमुळेच चित्रपटाचं आणखी नुकसान होतंय’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘हनुमानजी शंकराचे अवतार होते. यांच्याकडे डोकं नाही आणि हे रामायणाचे संवाद लिहित आहेत’, असा टोला नेटकऱ्यांनी लगावला आहे.
‘आदिपुरुष’मधील डायलॉग्सवर स्पष्टीकरण
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून आदिपुरुषमधील डायलॉग सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत. बजरंग बलीच्या तोंडी असलेला एक डायलॉग मोठ्या प्रमाणात ट्रोल केला जातोय. “कपडा तेरे बाप का, आग तेरे बाप की, तेल तेरे बाप का, जलेगी भी तेरी बाप की”, असा हा डायलॉग आहे. हा संवाद लिहिताना काही चूक झाली का, असा प्रश्न मुंतशीर यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “ही चूक नाही. अत्यंत सूक्ष्म विचारप्रक्रियेतनंतरच बजरंग बली आणि सर्व पात्रांसाठी डायलॉग लिहिण्यात आले आहेत. आम्ही जाणूनबुजून ते डायलॉग सोप्या भाषेत लिहिले आहेत. कारण आपल्याला एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की जर चित्रपटात अनेक पात्रं असतील तर प्रत्येकाची भाषा एकाच प्रकारची असू शकत नाही. प्रत्येक पात्राच्या भाषेत विविधता आणावी लागते.”
“आपल्याकडे जेव्हा आजी रामायणाची कथा सांगायची, तेव्हा त्या अशाच भाषेत सांगायच्या. ज्या डायलॉगचा तुम्ही उल्लेख केला, या देशाचे संत, मोठमोठे कथावाचक अशाच भाषेत बोलतात. अशा पद्धतीचे डायलॉग लिहिणारी मी पहिलीच व्यक्ती नाही. असे संवाद आधीपासूनच आपल्याकडे आहेत”, असंही ते पुढे म्हणाले होते.