Aindrila Sharma: मल्टिपल कार्डिॲक अरेस्टनंतर अभिनेत्रीचं निधन; 20 दिवस दिली मृत्यूशी झुंज
अभिनेत्री अँड्रिला शर्माची मृत्यूशी झुंज अपयशी; अवघ्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास
पश्चिम बंगाल: प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अँड्रिला शर्माची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. रविवारी दुपारी तिने अखेरचा श्वास घेतला. अवघ्या 24 व्या वर्षी अँड्रिलाने या जगाचा निरोप घेतला. 1 नोव्हेंबरपासून तिची प्रकृती चिंताजनक होती. हावडामधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मल्टिपल कार्डिॲक अरेस्टमुळे तिची प्रकृती नाजूक होती. अँड्रिलाने दोन वेळा कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज दिली होती. 1 नोव्हेंबर रोजी तिला ब्रेन स्ट्रोकसुद्धा झाला होता. यामुळे तिच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्या होत्या.
याआधी एक नाही तर दोन वेळा अँड्रिलाने कॅन्सरविरोधात यशस्वी झुंज दिली होती. 2015 मध्ये अकरावीत शिकत असताना पहिल्यांदा तिला कॅन्सरचं निदान झालं. त्यानंतर 2021 मध्ये तिच्या फुफ्फुसात ट्युमर झाला होता. सर्जरी आणि किमोथेरेपीनंतर तिची तब्येत ठीक झाली होती. मात्र 1 नोव्हेंबर रोजी ब्रेन स्ट्रोकमुळे तिला रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 20 दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती.
शनिवारी रात्री अँड्रिलाची प्रकृती आणखी बिघडली. शनिवारी तिला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर रविवारी दुपारी एकच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला.
View this post on Instagram
अँड्रिलाने ‘झुमर’ या टीव्ही शोमधून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. तिला खरी ओळख ही ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मिळाली. अँड्रिलाने कमी वयात इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि स्वत:ची वेगळी ओळख बनवली.
अभिनयक्षेत्रात काम करण्याचं अँड्रिलाचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने खूप मेहतनदेखील घेतली. मात्र या प्रवासात तिला तिच्या आरोग्याची साथ मिळाली नाही. अँड्रिलाच्या निधनावर बंगाली कलाविश्वातून शोक व्यक्त होतोय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीसुद्धा अँड्रिलाच्या निधनावर शोक व्यक्त केला.